सोलापूर - पुण्याच्या कैलास भिंगारे यांनी संकलित केलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन बुधवारपासून सुरू होत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखा, डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने त्याचे आयोजन करण्यात आले. डॉ. फडकुले सभागृहात सकाळी साडेदहाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल. त्यानंतर १५ जानेवारीपर्यंत रसिकांसाठी हसरी मैफल असणार आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण, बाळ ठाकरे, वसंत सरवटे, शि. द. फडणीस, मनोहर सप्रे, ज्ञानेश सोनार, प्रभाकर झळके, संजय मिस्त्री, संजय मोरे, वैजनाथ दुलंगे आदी व्यंगचित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेली बहुचर्चित चित्रे या प्रदर्शनात असतील. उद्घाटन कार्यक्रमासाठी हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास फुटाणे, कार्यवाह दत्ता गायकवाड, मसापच्या शाखेचे अध्यक्ष डॉ. सुहास पुजारी, कार्याध्यक्ष जे. जे. कुलकर्णी यांनी केले.
उद्या प्रात्यक्षिके, १५ ला परिसंवाद
गुरुवारी सायंकाळी पाचला फडकुले सभागृहातच व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके होतील. सायंकाळी पाचला होणाऱ्या या कार्यक्रमात नामवंत व्यंगचित्रकारांसह सोलापूरचे हेमंत कपुरे, पाेरे ब्रदर्स, सांबय्या कंदिकटला आदी सहभागी होतील. १५ जानेवारीला दुपारी चार वाजता परिसंवाद आयोजित केला आहे. त्यात सर्व वृत्तपत्रांच्या संपादकांना निमंत्रित केले. ‘वृत्तपत्रांतून व्यंगचित्रांचे स्थान हद्दपार झाले आहे काय?’ हा परिसंवादाचा विषय आहे.