आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण लाभापासून मातंग समाज हा कोसो दूर, राज्यमंत्री मधुकर कांबळे यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मागील अनेक वर्षांपासून मातंग समाजाची परवड होत आहे. सामाजिक, अार्थिक, राजकीय शैक्षणिक स्थिती भयावह आहे. समाजाला प्रत्यक्षात आरक्षणाचा लाभ मिळत नाही. खालच्या तळातील व्यक्तीला आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. त्यांना आरक्षण मिळाल्यास नक्कीच प्रगती होण्यास मदत होईल. समाज बांधव आरक्षण विविध शासकीय योजनांपासून आजही कोसो दूर आहे, असे प्रतिपादन साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष आणि राज्यमंत्री मधुकर कांबळे यांनी केले आहे. श्री. कांबळे हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. समाजाशी चर्चा करण्यासाठी ते सोलापुरात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

 

कांबळे म्हणाले, अनुसूचीत जातीच्या प्रमाणात वर्गीकरण करण्याची मागणी आहे. त्यानुसार शासन दरबारी आरक्षणाचे जातीच्या प्रमाणात वर्गीकरण होईल. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी शासनाकडून ३५० कोटींचा निधी मिळणार आहे. प्रत्यक्षात काम करण्यास सुरुवात झाली आहे. स्मारकाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात हा पश्न मार्गी लागला आहे. त्यानुसार समिती गठीत करून समितीकडून काम करण्यास सुरुवात झाली आहे. अण्णा भाऊंची २०२० मध्ये जन्मशताब्दी आहे. त्याआधी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम पूर्ण होईल. 

 

मुंबई येथील चिराग नगर घाटकोपर येथे अण्णा भाऊ साठे यांची कर्मभूमी आहे. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक होणार आहे. अण्णा भाऊ हे २५ बाय ३० फुटाच्या जागेत राहात होते. त्याच्या अासपास ७५० झोपड्या आहेत. तीही जागा घेतली जाणार आहे. बाजूलाच दोन एकर जागा पालिकेने दिली आहे. एकूण साडे सात एकर स्मारकासाठी जागा आहे. परंतु अगोदर झोपडपट्ट्या धारकांचे पुनर्वसन करून त्या ठिकाणी स्मारक होईल. 

 

अण्णा भाऊंच्या स्मारकामध्ये यूपीएससी, एमपीएससी पूर्वतयारी, कला संगीत विद्यालय, ड्रामा सेंटर, साहित्य ग्रंथालय तयार केले जाणार आहे. याचा समाजाच्या विकासासाठी मोठा हातभार लागेल, असे कांबळे यांनी सांगितले. 

 

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा वर्षभरात ९०० जणांना लाभ 
क्रांतिवीरलहुजी वस्ताद साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या ६८ शिफारशींपैकी एक शिफारस प्रत्यक्षात लागू केली. त्या शिफारशींपैकी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यात मदत झाली. वर्षभरात राज्यातील ९०० जणांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. त्यापैकी १२५ जणांना प्रत्यक्षात नोकरी मिळाली आहे. अभ्यास आयोगाच्या महत्त्वाच्या शिफारशी प्रत्यक्षात लागू कराव्यात. यासाठी आगामी काळात प्रयत्नशील राहणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...