आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... आणि प्राचीन धूप मार्गावरील मक्का शहर कायमचे बदलले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- इसवी सन ६३०च्या जानेवारीत मक्का शहराच्या वेशीवर पूर्वाश्रमीचा सौदागर प्रकटला. त्याच्या सोबत दहा हजारांचा फौजफाटा होता. शत्रूतर्फे त्यास कोणताही विरोध झाला नाही. मक्केचा थेट पाडाव झाला. व्यापारी धार्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध शहर सहज ताब्यात आले. प्रेषितत्त्वाने ही किमया साधली. प्राचीन आंतरराष्ट्रीय धूप मार्गावरील आणि मसाले मार्गावरील प्रमुख शहर कायमस्वरूपी बदलले. 


मक्का शहर असे दुसऱ्यांदा बदलले. या आधी अडीचशे वर्षांपूर्वी पैगंबरांच्याच कुरेश कबिल्यातील कुसे ऊर्फ जैद बिन किबाल यांच्या काळात मोठा बदल झाला होता. इ. स. ४००च्या सुमारास कुसे मक्का शहराचा प्रमुख बनला. त्यावेळी मक्केत विविध अरब कबिले आणि त्यांच्या घराणी राहात होती. त्यात काही ख्रिस्ती कबिलेही होते. अरब महाद्विपात विखरून असलेल्या स्वत:च्या कुरेश कबिल्यातील घराण्यांना मक्केत येऊन वसण्याचे निमंत्रण दिले. सुमारे दोन हजार वर्षानंतर हा कबिला पुन्हा आपल्या शहरात परतला. त्यामुळे कुसे यांना राजकीय बळकटी मिळाली. त्यांनी मक्केची नव्याने व्यवस्था लावली. काबागृहाच्या जवळ लोकवस्ती नव्हती. त्यांनी तिथे घरे बांधली. लोकांना सामाजिक दर्जानुसार जवळची घरे दिली गेली. पाण्यासाठी विहिरी खणण्यात आल्या. शहराभोवती सुरक्षा भिंत बांधण्यात आली. शहराचे कामकाज पाहण्यासाठी जबाबदारीनुसार चार समिती नेमल्या. 


कुसे याच्या यशाचे सूत्र म्हणजे ऐक्य आणि तटस्थता. व्यापारी मार्गावरील इतर शहरही विकसित होत होते. मात्र, त्यांना मक्केसारखी धार्मिक पार्श्वभूमी नव्हती. तसेच मक्का शहराचे व्यापारी स्पर्धेतील स्थान भक्कम करण्यासाठी काबागृहात आणि त्याच्या परिसरात विविध कबिल्यांच्या देवतांच्या प्रतिमा आणून ठेवण्यात आल्या. अनेक देवतांत अल लाह (ईश्वर) प्रमुख देवता होती. त्याशिवाय हुबल, लात, मनाह आणि उज्जा यांच्या प्रतिमा ठेवलेल्या होत्या. त्यामुळे सर्व कबिल्यांमध्ये ऐक्य निर्माण झाले. 


धार्मिक आणि राजकीय बाबतीत कुसे याने तटस्थता बाळगली. सर्व धर्माच्या, सर्व कबिल्यांना, त्यांच्या व्यापारी काफिल्यांना शहरात येण्यास मुभा ठेवली. अरबच्या दक्षिणेत यमनमध्ये ख्रिश्चनांचे तर पूर्वेकडे पर्शियन पारशी साम्राज्य होते. उत्तरेकडे रोमन साम्राज्य होते. यातिन्ही सत्ताधीशांच्या फार जवळ जाता आणि फार दूर जाता कुसे यांनी कौशल्याने मक्का शहराचे स्वतंत्र अस्तित्व ठेवले. शहराचा कायापालट झाल्याने त्याची आणखी लौकिक वाढला. 


खरं तर मक्केचे अस्तित्व सुमारे चार हजार वर्षांपासून आहे. एकेश्वरवादी प्रेषित इब्राहीम यांनी इ. स. पूर्व २०००च्या सुमारास मक्का शहराची स्थापना केली, असे मानलेे जाते. मुलगा इस्माईल याच्या मदतीने छत नसलेले काबागृह बांधले. अरबीत काबा म्हणजे घन. प्राचीन साधनांमध्ये मक्का शहराचा उल्लेख मिळतो. असिरियन राजा शालमनेसर (तिसरा) याच्या काळातील कारकार युद्ध प्रसंग (इ.स. पूर्व ८५३) वर्णनात मक्का शहरवासीयांचा उल्लेख आलेला आहे. बायबलच्या जुन्या करारात राजा डेव्हिड (दाऊद, इ. स. पूर्व १०४०-९७०) याला वाहिलेल्या स्तुतीकाव्यातही (साम) उल्लेख आलेला आहे. ग्रीक इतिहासकार डिओडोरस सेल्यूकसने त्याच्या बिबलियोथिका हिस्टोरिका (इ. स. पूर्व १००)मध्ये पवित्र काबागृहाचा उल्लेख केला आहे. तसेच क्लाउडियस टॉलेमीच्या (इस. ९०-१६८) प्रसिद्ध ग्रीक पुस्तक जिओग्राफीमध्येही मक्का शहराचा उल्लेख आलेला आहे, असे संशोधकांनी दाखवून दिले आहे. 


प्राचीन भूमध्यसागरीय देश आणि अगदी इजिप्तपर्यंत धूप, ज्याला अरबीत लोभान म्हटले जाते, त्याचा व्यापार चाले. याचाही मार्ग खास होता. आज तो धूप मार्ग म्हणून ओळखला जातो. त्यात मक्का प्रमुख शहरात होते. तसेच पूर्वेकडील इंडोनेशिया, जावा, सुमात्रा, दक्षिण भारत येथील लागवड असलेले मसाले भूमध्यसागरीय देश आणि ग्रीक-रोमन साम्राज्यापर्यंत जात होते. हा प्रसिद्ध मसाल्यांचा मार्ग अरबांच्या भूभागातून जात होता. व्यापाऱ्यांचे काफिले वाटेतील मक्का शहरात थांबत. प्रेषित इब्राहीम यांनी सुरू केलेल्या काबागृहाच्या यात्रेचा परिपाठ सुमारे अडीच हजार वर्षानंतरही सुरू होता. सर्व अरबी कबिले वर्षातून एकदा या यात्रेत सामील होत. मोठी उलाढाल होई. 


मक्केत व्यापारी विविध देशातील वस्तू खरेदी-विक्रीसाठी आणत. िचनी रेशीम, भारतीय-दक्षिण आशियायी मसाले, इजिप्तमधून तलम सुती कापड, अनातोलियातून रंगीत चामडे, बसरा शहरातून शस्त्रे, आफ्रिका-पर्शियातून गुलाम आणले जात होते. सुगंधी लाकूड, सुगंधी तेल, अत्तर, सोने, चांदी आणि मौल्यवान दगड अरब प्रांतातून येई. मरुउद्यानांमधून फळे, भाज्या विक्रीस येत. व्यापारी वस्तू विकत घेत आणि पुढच्या शहरांसाठी काफिले निघून जात. 


या मोठ्या उलाढालीतून मक्का शहराला चांगला महसूल मिळे. त्यामुळे यात्रा आणि व्यापार अबाधित राहील, अशी व्यवस्था मक्केचे सत्ताधीश करत. यात्रा काळात लढाई आणि हिंसेला बंदीची प्रथा रुढ झाली. आपसात पिढ्यान््पिढ्या वैरभाव जोपासणाऱ्या सर्वच टोळ्या तिचा सन्मान करत असत. त्यामुळे व्यापारासाठी आवश्यक शांतता आणि सुरक्षिता निश्चित झालेली होती. शहरात मुक्कामाची व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था केलेली असे. दरवर्षी यात्रा सुबत्ता घेऊन येई. परिणामी मक्का शहर भांडवलशाहीचा गड बनला. 


पुढे कुसे यांच्यानंतर त्यांच्या नातवांकडे सत्ता आली. एक हिशाम उर्फ अमेर. मुलगा शयबाह लहान असतानाच हिशाम यांचे निधन झाले. मुलाचे संगोपन काका मुत्तालीब यांनी केले. शयबाहला अब्दुल मुत्तालीब नाव मिळाले. मक्केचा वारसा अब्दुल मुत्तालीबकडे आला. मुलगा अब्दुलाहाच्या अकाली निधनानंतर नातू मुहम्मद यांचा सांभाळ त्यांनी केला. कुसे यांच्या अडीचशे वर्षानंतर मक्केला आर्थिक आणि सामाजिक समतेचे अधिष्ठान देण्याची क्रांती पैगंबर मुहम्मद (त्यांना शांती लाभो) यांनी केली. 

बातम्या आणखी आहेत...