आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरोत्थान योजना, नुसत्याच बैठका, निधी नसल्याने कामे ठप्पच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मुंबईत बैठक झाली. राज्याचे नगरविकास खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सोलापूरला योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील निधी देण्यात येईल, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. महापालिकेचे प्रभारी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी बैठकीला उपस्थित होते. राज्यातील सर्व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
शहरात मोहिमेअंतर्गत ५६४ कोटींच्या रस्ते आणि ड्रेनेज योजनेची कामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यातील ८७ कोटींचे अनुदान मिळाले असून त्यातून कामेही झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ८७ कोटींची महापालिका वाट पाहात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस सोलापुरात आले असता निधीसाठी मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी विनंती केली. याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. नुकतीच आमदार प्रणिती शिंदे यांनी नगरविकास खात्याचे सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे महापौर प्रा. सुशीला आबुटे यांच्यासमवेत मुंबईत बैठक घेतली. ऑगस्टमध्ये निधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. योजनेत सरकारचा ७० टक्के तर महापालिकेचा ३० टक्के हिस्सा आहे.

८७ कोटी निधीची प्रतीक्षा
२३२ कोटींचे रस्ते आणि ३३२ कोटींचे ड्रेनेज काम सन २०१२ मध्ये सुरू करण्यात आले. फेब्रुवारी २०१४ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित होते, ते झाले नाही. कामाची गुणवत्ता आणि मंदगतीमुळे मक्तेदार बदलण्यात आला. आता कामाची मुदत डिसेंबर २०१५ पर्यंत आहे. उर्वरित काम या काळात पूर्ण होणे अशक्य आहे.

हुडको देणार कर्ज
महापालिकेला त्याच्या हिश्यातील रक्कम उभी करणे कठीण असल्याने राज्य सरकार कर्ज रूपाने उपलब्ध करून देणार आहे. हे कर्ज गृह शहर विकास महामंडळ (हुडको) देणार आहे. त्यांच्याकडे महापालिकेने ८६ कोटी रुपयांच्या कर्जासाठी कागदपत्रे सादर केली आहेत.
महापालिकांचा आढावा घेतला
नगरोत्थान योजनेबाबत शासनाकडे बैठक झाली. त्यात सोलापूरसह सर्व महापालिकांचा आढावा घेतला. शासनाकडून दुसऱ्या टप्प्याचे अनुदान देणार असल्याचे सांगण्यात आले.” लक्ष्मण चलवादी, प्रभारी नगर अभियंता, महापालिका