सोलापूर- गेल्या चार वर्षांपासून दौंड ते दिल्ली दुधाची वाहतूक करणाऱ्या मिल्क ट्रेनच्या सेवेला आता ब्रेक लागला आहे. मिल्क ट्रेनसाठी मुख्य सुरक्षा (सेफ्टी) आयुक्तांची परवानगी घेतली नसल्याचे उघड झाल्याने ही सेवा तत्काळ थांबवण्याचे आदेश सोलापूर रेल्वे विभागाला देण्यात आले. त्यानुसार ही सेवा थांबवण्यात आली आहे. मुख्य सुरक्षा आयुक्तांनी दणका दिल्यानंतर सोलापूर रेल्वे प्रशासनाने आता परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. परवानगी मिळाल्यानंतरच मिल्क ट्रेन धावणार आहे.
सोलापूर रेल्वे विभागातील दौंड स्थानकावरून मिल्क ट्रेन धावत होती. केवळ दुधाची वाहतूक करणारी ही देशातील दुसरी रेल्वे होती. मदर्स डेअरीकडून सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांतून दूध संकलित झाल्यानंतर दौंड स्थानकावरून हे दूध विशिष्ट वॅगनमध्ये चढविले जात. दोन ते तीन दिवसांचा प्रवास करून हे दूध दिल्लीला पाेहोचवले जात. ही रेल्वे सुरू करण्यापूर्वी मुख्य सुरक्षा आयुक्तांची परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र सोलापूर रेल्वे प्रशासनाने परवानगी घेताच रेल्वे सुरू केली. मुख्य सुरक्षा आयुक्त सुशील चंद्रा यांनी दौंड रेल्वे स्थानकाची नुकतीच पाहणी केली तेव्हा ही बाब निर्दशनास आली.दूध वाहतुकीतून सोलापूर विभागाला चांगले उत्पन्न मिळत होते. जूनमध्ये दूध वाहतुकीतून २० लाखांचे उत्पन्न मिळाले.
पुन्हा परवानगी घेणार
रेल्वेरुळावरून एखाद्या वेळी नव्या प्रकारचे इंजिन, डबे अथवा वॅगन धावणार असतील तर त्यासाठी मुख्य सुरक्षा आयुक्तांची परवानगी घेणे गरजेचे आहे. त्यानुसार आता परवानगी घेऊन मिल्क ट्रेनची सेवा पूर्ववत सुरू होईल. शिवाजीकदम, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता, सोलापूर