सोलापूर- सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाका, असा दबाव मी अधिकाऱ्यांवर अाणल्याची चर्चा मध्यंतरी झाली. त्या वेळी मी केंद्रीय गृहमंत्री नव्हतो. यामुळे या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. ज्या अधिकाऱ्यावर दबाव अाणल्याचे सांगण्यात येते, डायरीत नोंद करण्याचे अादेश होते, असे म्हटले जाते ते सगळे खोटे अाहे. मी असे कधी म्हणालाे नाही. गरज भासल्यास गृह विभागाकडून याची चौकशी करून खरा प्रकार समोर अाणा, असे स्पष्टीकरण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी दिले.
शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, पाकिस्तान व अन्य देशांत जाऊन पंतप्रधानांची गळाभेट घेतात. चीनसोबत तणाव असताना त्यांच्याशी संवाद साधत नाहीत याबाबत चर्चा होणे गरजेचे अाहे.
इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याकडे नेतृत्वगुण होते. अाता भाजप म्हणते, दोघांना काहीच कळत नाही. विकास न करताच भारत देश अाघाडीवर कसा काय अाला? नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होणे हे काही एका रात्रीत झाले नाही. अनेक दिवसांपासून खलबते सुरू होती, असेही ते म्हणाले.