पंढरपूर- घराचे माळवद अंगावर पडल्याने सहा महिन्यांच्या मुलीसह आईचा दुर्दैवी मृत्यू झाला तर वडील जखमी झाले. मंगळवारी (दि. १४) मध्यरात्री पावणेबाराच्या सुमारास करकंब (ता. पंढरपूर) येथे ही दुर्घटना घडली. सारिका रुपेश सदावर्ते (वय ३१), श्लोक रुपेश सदावर्ते (६ महिने) अशी मृतांची नावे अाहे. तर रुपेश नागनाथ सदावर्ते (वय ३५) हे जखमी झाले.
मागील अाठवड्यात झालेल्या पावसाने सदावर्ते यांच्या घराला गळती लागली होती. माळवदावरील फरशी फुटली होती. त्यामुळे मंगळवारी त्याचे काम सुरू होते. काम संपल्यानंतर रात्री रुपेश हे घरात गेले. त्यांच्या पत्नी सारिका ह्या मुलीला औषध पाजत हाेत्या. त्यामुळे तेही खाटेवर बसले. त्यावेळी अचानक माळवद ढासळले. त्याच्या ढिगाऱ्याखाली सारिका, श्लोक रुपेश सदावर्ते हे गाडले गेले. ग्रामस्थांसह शेजाऱ्यांनी तातडीने ढिगारा उपसला. अर्ध्या तासानंतर तिघांना बाहेर काढण्यात यश आले. त्यांना खासगी रुग्णालयात नेले असता सारिका श्लोक हिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. तर रुपेश हे जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
लग्नाच्या १२ वर्षांनंतर झालेली मुलगी गमावलीछायाचित्रकाराचा व्यवसाय असलेले रुपेश सारिका यांना लग्नाच्या १२ वर्षांनंतर श्लोक हिचा जन्म झाला होता. त्यांना ही सहा महिन्यांची एकुलती एक मुलगी होती. या दुर्घटनेने रुपेश यांना पत्नी सारिका यांच्याशी ताटातूट झाली, शिवाय लहानग्या श्लोक हिलाही गमवावे लागले.