आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...परी कीर्तीरूपे उरावे, अपघातात ब्रेनडेड झालेल्या पोटच्या गोळ्याचे मातेकडून स्वेच्छेने अवयवदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रिक्षा चालवणारा पोटचा गोळा अपघातात गंभीर जखमी झाला. उपचारासाठी तीन शहरे पालथी घातली. पण उपयोग झाला नाही. सोलापुरातील डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केले. मात्र एका माऊलीने दु:ख पचवून, मन खंबीर करून एक निर्णय घेतला. मुलाचे अवयवदान करून त्याला कीर्तीरूपे जिवंत ठेवण्याचा. लागलीच त्यासाठी ग्रीन काॅरिडॉर तयार करण्यासाठी सारे सज्ज झाले... 

डोळ्यात पाणी आणणारी ही कहाणी अशी... 
ओंकार अशोक महिंद्रकर (वय २१, रा. बसवकल्याण, जि. बीदर). रिक्षा चालवतो. मंगळवारी रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सोलापूर-हैदराबाद रोडवर त्याच्या रिक्षाला कवड्याळ (ता. बसवकल्याण) येथे कंटेनरने उडवले. अपघातानंतर चालक कंटेनरसह पसार झाला. मात्र अांेकारच्या डोक्याला मुका मार लागला. तो बेशुद्ध पडला. बसवकल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून उमरगा येथील डॉ. उपासे यांच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. पण उपचार झाला नाही. तेथून सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. आई रेणुका महिंद्रकर सोबतच होत्या. तपासणीत आेंकार ब्रेनडेड असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आई रेणुका यांनी ओंकारच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय व्यक्त केला. ओंकारचे हृदय, डोळे, किडनी, यकृत हे अवयव दान करण्यात येतील. 

तीन मार्गांवर ग्रीन कॉरिडॉर 
अवयवदानासाठीसोलापूर ते पुणे मार्गावर सकाळी सात वाजता ग्रीन कॉरिडॉर लावण्यात येईल. काही महत्त्वाचे अवयव सकाळी हेलिकॉप्टरने पुण्याला पाठवण्यात येतील. यासाठी सिव्हिल हॉस्पिटल ते विमानतळ येथेही सकाळी वाजता ग्रीन कॉरिडॉर असेल. काही अवयवांचे दान कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण रुग्णालयासही प्राप्त होणार आहे. यासाठी सिव्हिल ते कुंभारी ग्रीन कॉरिडॉर लावण्यात येणार आहे.
 
रात्री अकरा वाजता पुणे येथून २० डॉक्टरांचे पथक निघाले. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल आयसीयू मध्येही १० ते १२ डॉक्टरांची टीम कार्यरत होती. ब्रेनडेड रुग्णाचा रक्तदाब कमी कमी होत गेल्यास अवयव त्या त्या प्रमाणात निकामी होत राहतात. जास्तीत जास्त अवयव जिवंत ठेवण्याचे रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. पहाटे पुण्याहून आलेले डॉक्टरांचे पथक शस्त्रक्रिया करून हे अवयव पुण्याला पाठवेल. सकाळी सात वाजेपर्यंत शस्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर ग्रीन कॉरिडोरने हे अवयव पुढील प्रत्यारोपणासाठी तातडीने विविध रुग्णालयांत पाठवले जातील, अशी माहिती डॉ. संदीप मोहोळकर डॉ. राजेश चौघुले यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...