आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण सोलापूर दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यात पाणी चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कायार्लयासमोर धरणे आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
तालुकाध्यक्ष बसवराज बगले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अप्पाराव कोरे, विजयकुमार हत्तुरे, पंचायत समिती सदस्य आमसिद्ध कांबळे, चंद्रशेखर भरले, अख्तरताज पाटील, बिपीन करजोळे, महिला अध्यक्षा संगम्मा सगरे, मिलिंद मुळे, अण्णाराव पाटील, राहुल बनसोडे, परमेश्वर सावंत, माळकवठेचे सरपंच शिवनिंग बगले, सलीम शेख, अकबर पटेल आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदार रघुनाथ पोटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

गेल्या दोन- तीन वर्षांपासून कमी पाऊसमान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणी चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्याची आणेवारी चुकीची झालेली आहे. आणेवारीची दुरुस्ती करून तालुका दुष्काळग्रस्त जाहीर व्हावा. शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे. उजनीतून भीमा नदीत सोडलेले पाणी चिंचपूर बंधाऱ्याच्या खाली सोडले जात नाही. हिळ्ळीपर्यंत पाणी सोडल्यास अक्कलकोटसह नदीकाठच्या गावांचा पाणी प्रश्न सुटेल. तेव्हा हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडावे. सीना नदीतही दर तीन महिन्यानी पाणी सोडावे. विहिरी बोअर बंद पडत असल्याने अनेक गावांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते आहे. मागणी केल्यास तातडीने टँकर मंजूर करावे. पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना चारासाठी अनुदान द्यावे. रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावे. शिरवळ होटगी तलावात कालव्याद्वारे पाणी सोडून दोन्ही तलाव भरून घ्यावे. एकरुख योजनेचे काम लवकर पूर्ण करावे तसेच राष्ट्रीयीकृत जिल्हा बँकेकडून कर्जवाटप सुरू करावे, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.