आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजच्या पिढीचे प्रश्न, समस्या समजून घेणे अवघड, सोडवणे सोपे : मृणाल कुलकर्णी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - बहुतांश वेळी पालकांना मुलांच्या अडचणींची जाण झाल्यामुळे प्रगती खुंटते. कुटुंबामध्ये विसंवाद असल्यास मुले याबाबत काहीच बोलत नाहीत. त्यांच्याशी सातत्याने संवाद साधून त्यांची अडचण समजून घ्यावी, असे आवाहन प्रसिद्ध सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले. 
 
उस्मानाबादेत जिल्हा ब्राम्हण महासंघाच्या वतीने रविवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उद्योजक संतोष शेटे होते. या वेळी मृणाल याचे पती अॅड. रूचीर कुलकर्णी, महासंघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुरेखा कुलकर्णी, आनंद कुलकर्णी उपस्थित होते. मृणाल म्हणाल्या की, सध्याच्या वेगवान जीवनशैलीत कुटुंब मुलांमधील दरी वाढत आहे. अप्रिय घटना घडल्यानंतरच याची जाण होते.
 
आजच्या पिढीचे प्रश्न, समस्या खूपच वेगळ्या आहेत. त्या समजून घेणे मुळात अवघड आहे. मात्र, सोडवणे खूप सोपे आहे. यासाठी पालकांना त्यांचा अभ्यास करावा लागणार आहे. प्रत्येक घटकांची माहिती जाणून घ्यावी लागेल कारण मुले, मुलीच उद्याची खरी संपत्ती आहे. यामुळे धकाधकीतही त्यांच्यासाठी वेळ राखून ठेवावा लागणार आहे. १० वी १२ वीचा टप्पा आटोपल्यावर जीवनाच्या नव्या क्षितिजामध्ये त्यांचा प्रवेश होतो. यावेळी त्यांचा निर्णय त्यांनाच घेऊ द्या, मदत भक्कम साथ आपणच द्यायला हवी, असेही त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन कवी राजेंद्र अत्रे स्वप्णाली अत्रे यांनी केले. दहावी बारावी, प्रज्ञा शोध परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. जिल्ह्यातील ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यातआली. कार्यक्रमासाठी बिपिन गंधोरकर, धनंजय जेवळीकर, मिलिंद व्यवहारे, संतोष बडवे, अभय पाथ्रुडकर, श्रीराम कोकीळ, महेश पाठक, अजय नाईक, मनीषा गोवर्धन, विनिता कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. 

मनोरंजन क्षेत्रातही संधी 
मृणाल म्हणाल्या, मनोरंजन क्षेत्रात कोणत्याही वयाच्या व्यक्तीला संधी आहेत. नवीन मालिकांमधून वेगळे विषय हाताळले जात आहेत. तेथेही करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जुजबी प्रशिक्षण घेतल्यावर तेथे सहज संधी मिळू शकते. 
 
बातम्या आणखी आहेत...