आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या अंदाजपत्रकात मंजूर कामे कागदावरच, नागरिकांची होतेय दिशाभूल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महानगर पालिकेने२०१५-१६ वर्षासाठीचे अंदाजपत्रक तयार करताना त्यात रस्ते बांधणीसाठी ७.५ कोटींची तरतूद केली. त्यातील नगरसेवकांनी सुचविलेली काही अंतर्गत रस्त्यांची कामे अंदाजपत्रकाचा कालावधी संपला तरी सुरू झालेली नाहीत. काही कामे अाजही टेंडरच्या प्रक्रियेत किंवा टेंडर झाले पण प्रत्यक्ष कामे सुरू नाहीत.
अंतर्गत रस्त्यांची कामे खूप छोटी अाहेत. पण नागरिकांसाठी त्या रस्त्यांचे मोठे महत्त्व आहे. गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकातील सात कोटी पैकी निम्मीही कामे झालेली नाहीत. त्यामुळे मंजूर झालेला निधी कुठे गेला? असा प्रश्न अाहे. त्यानंतर २०१६-१७ साठीच्या अंदाजपत्रकातही थोडीशी अाकडेमोड करत पुन्हा रस्त्यासाठी सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात अाली. अाता अंदाजपत्रक होऊन तीन महिने झाले, नवीन कामे तर नाहीतच. पण गेल्या अंदाजपत्रकातीलही अनेक कामे सुरू झालेली नाहीत. केवळ अडीच कोटीची कामे कशीबशी मार्गी लागली अाहेत.
अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत सोडून दिली आहेत.

बिले मिळत नाहीत, ठेकेदार येत नाहीत
महापालिका अंदाजपत्रकात मंजूर झालेल्या कामांची बिले वेळेवर मिळत नाहीत, त्यामुळे कोणी ठेकेदार अंदाजपत्रकातील कामे घ्यायला पुढे येत नाहीत, असे चित्र सध्या दिसते अाहे. काही ठेकेदारांनी कामे घेतली पण टेंडर भरताना कमी रकमेचे भरून कामे घेतली. पण नंतर परवडत नाहीत म्हूणन त्या कामांना हातच लावला नाही, असे प्रकार सर्रास होताहेत.

१. महापालिकेचे ठेकेदार टेंडर प्रक्रिया करतात, वर्कअाॅर्डर घेतात पण प्रत्यक्षात कामे सुरू करीत नाहीत, अशा तक्रारी वाढल्या अाहेत. शेळगी येथील रस्त्याच्या कामाचा असाच प्रकार समोर अाला अाहे. नगरसेवकांकडे नागरिक दररोज हेलपाटे मारताहेत. पण प्रत्यक्षात रस्त्याचे काम काही सुरू होत नाही. नगरसेवक हे काम मंजूर अाहे, लवकरच होईल, असे दररोजच सांगतात.

२. असाच एक प्रकार अंत्रोळीकर नगर पाठीमागील परिसरात घडतो अाहे. गेल्या अंदाजपत्रकात त्या रस्त्याचे काम मंजूर झाले. अजूनही पूर्णत्वाला अालेले नाही. बसवेश्वर नगरातील एका रस्त्याचे काम २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात मंजूर झालेे, दीड वर्षानंतर अाता कुठे तिथे मोठे दगड येऊन पडले अाहेत. शहरातील अनेक ठिकाणी ही स्थिती अाहे.

३. मराठा वस्ती येथील शौचालये बांधण्याचे काम असेच सुरू करण्यात अाले. काही दिवसांपूर्वीच ते काम पूर्ण झाले. पण तेथेही गैरसोयी अधिक अाहेत. नळाचे कनेक्शन दिलेले नाही. काही कामे अर्धवट अाहेत. तेथेच एका रस्त्याचे गेल्या अाठवड्यात उद््घाटन झाले पण प्रत्यक्षात कामाला काही सुरुवात झालेली नाही. अशी अनेक उदाहरणे समोर येऊ लागली अाहेत.

बिले वेळेवर नसल्याने कामे अर्धवट
^अंदाजपत्रकातील कामांची बिले प्रशासनाकडून वेळेवर दिली जात नाहीत. ठेकेदारही कामे घेण्याच्या स्पर्धेमुळे कमी दरात टेंडर भरतात अाणि नंतर अडचणीत येतात. ही कामे पैसे गुंतवणूक करून केल्यानंतर त्यांना महापालिका वेळेत पैसे देत नाही, अन् िदले तर टप्प्याटप्प्याने दिले जातात. ते परवडत नाही. त्यामुळे ठेकेदार कामे सोडून देतात. त्यामुळे कामे अर्धवट राहण्याचे वेळेवर होण्याचे प्रमाण वाढले अाहे. यू.एन. बेरिया, माजी महापौर
तीनकोटीची बिले द्यायला सांगितली.

^शासनाकडून एलबीटीपोटी येणारा निधी प्रशासकीय वेतनावरच खर्च होतो. शासनाकडून वेगळा निधी मिळत नाही. त्यामुळे ठेकेदारांना बिले मिळत नाही, अशी तक्रार होती. पण अाम्ही अायुक्तांना तीन कोटी रुपयांची बिले वाटप करा, असे सांगितले अाहे. अंदाजपत्रकात मंजूर झालेली सर्व कामे होणार अाहेत. कोणताही निधी लॅप्स होऊ दिला जाणार नाही. टप्प्याटप्प्याने का होईना बिले अदा केली जातील. संजयहेमगड्डी, सभागृह नेता, मनपा

झोन अधिकाऱ्यांकडून कामे
^महापालिकेच्या अंदाजपत्रकात मंजूर झालेली २० लाखांपर्यंतची कामे झोन कार्यालयाकडून होतात. त्यामुळे ती का होत नाहीत, किंवा थांबलेली असल्यास ती का थांबली अाहेत याची माहिती घ्यावी लागेल. ठेकेदारांची बिले वेळेवर दिल्याने असे होते हे काही प्रमाणात खरे अाहे पण बिले देण्याचा प्रयत्न होत अाहे. याबाबत झोन अधिकाऱ्यांनाच विचारावे लागेल. लक्ष्मण चलवादी, प्रभारी नगरअभियंता
अार्थिक परिस्थिती बिकट
^महापालिकेचे अधिकारी लवकर इस्टिमेट करत नाहीत, त्यातच महापालिकेची अार्थिक परिस्थिती बिकट अाहे. त्यामुळे ठेकेदार कामे करायला तयार नाहीत. नगरसेवकच ठेकेदारांना पकडून अाणून कामे करा म्हणत अाहेत. सत्ताधारी पक्षाकडून यावर अंकुश नाही. प्रशासनाने अंदाजपत्रकातील कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे अाहे. तो होत नाही, त्यामुळेही कामे रेंगाळत असल्याचे दिसत आहे. नरेंद्रकाळे, विरोधी पक्षनेता, मनपा
महानगरपालिका अंदाजपत्रकात शहरातील विकासाची अनेक कामे मंजूर केली जातात. त्यात प्रामुख्याने नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाइन, पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन अादी कामांचा समावेश अाहे. मंजूर झालेली कामे प्रशासकीय सोपस्कार होऊन टेंडरला येईपर्यंत जवळपास सहा महिने उलटून जातात. टेंडर निघाल्यानंतर ते मंजूर करण्याचे वेगळे सोपस्कार व्हायला काही वेळ जातो, वर्क अाॅर्डर दिली जाते. पण पुढे प्रत्यक्षात निधी नसल्याचे सांगून कामच सुरू केले जात नाही. असे अनेक प्रकार समोर अाले अाहेत. नगरसेवक मनपा प्रशासनालाही त्याचे फारसे गांभीर्य नाही. केवळ नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम होते.
बातम्या आणखी आहेत...