आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी निवडणूक वॉर्ड रचनेत, बंडखोर, अपक्षांची होणार चांदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्यातील महापालिकांच्या आगामी निवडणुका वॉर्ड रचनेनुसार होतील. त्याच्या तयारीची सूचना दिली आहे, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली. याविषयीचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने यापूर्वी प्रसिद्ध केले आहे. लोकसंख्येसाठी २०११ची जनगणना ग्राह्य धरण्यात येईल. निवडणुकीपूर्वीची अंतिम मतदार यादी वापरण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसंख्या गृहित धरून शहरात ११० वाॅर्ड अस्तित्वात येतील असा अंदाज आहे. वार्ड रचनेत अपक्षांची संख्या वाढण्याची शक्यता असून त्याचा फटका राजकीय पक्षांना बसेल. महापालिकेच्या आतापर्यंतच्या निवडणुकीत असेच दिसून आले आहे. प्रभाग रचनेत राजकीय पक्षाचे वर्चस्व असल्याने पक्षाचे नगरसेवक अधिक निवडून आले. २०११ च्या जनगणनेवर आधारित महापालिका निवडणुका झाल्यास शहरात सुमारे १०८ ते ११० नगरसेवकांची संख्या होईल. तर स्वीकृत सदस्य जमेस धरल्यास सभागृहात ११४ ते ११६ नगरसेवक असतील. वार्ड रचनेमुळे वैयक्तिक ताकदीला महत्त्व येणार अाहे. बंडखोर अाणि अपक्ष नगरसेवकांची संख्या वाढेल. याशिवाय तरुण मंडळ, समाजाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसेल.

जिल्ह्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सहारिया यांनी जिल्हा पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांना माहिती दिली. सहारिया म्हणाले की, जिल्ह्यातील निवडणुका शांततेत पार पडण्यास हजार ५०० पोलिस कर्मचारी १५ हजार महसूल प्रशासनाचे कर्मचारी कार्यरत आहेत. ५२१ ग्रामपंचायतींमध्ये हजार ४० जागांसाठी नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. हजार १८ मतदान केंद्र असून ११ लाख १५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

युतीला पोषक
^युतीत येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. वार्ड पध्दतीमुळे पक्षाची जोड आणि वैयक्तीक कामामुळे नगरसेवक होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. वार्ड पध्दतीत अपक्ष नगरसेवकांची संख्या जास्त असेल. वार्ड पध्दत युतीला पोषक वातावरण असेल.” महेश कोठे, नगरसेवक, शिवसेना

युतीकडून वेळ निघून गेली
^वॉर्ड पद्धतीचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. त्याप्रमाणे कोल्हापूर कल्याण-डोंबवली महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. यापुढील काळात सर्व मनपा निवडणुका प्रभाग पध्दतीने घेता येत नाही. त्यामुळे निर्णय बदलण्याची वेळ युतीकडून केव्हांच निघून गेलेली आहे. मनोहर सपाटे, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

ही तांत्रिक बाब आहे
^प्रभाग किंवा वार्ड झाले तर भाजपला काही फरक पडत नाही. ती तांत्रिक बाजू आहे. जनाधार आमच्या बाजूने आहे. महापालिकेतील काँग्रेसचा नाकर्तेपणा हे प्रमुख कारण आहे. केंद्र राज्याप्रमाणे जनता महापालिका युतीकडे देईल.” प्रा.अशोक निंबर्गी, नगरसेवक, भाजप

काँग्रेसचीच सत्ता येणार
^केंद्र राज्यातील युती सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारावर घाला घातला आहे. महापालिकेचे आर्थिक कोंडी करून नागरिकांच्या सुविधेवर घाव घातली. त्यामुळे वार्ड असो किंवा प्रभाग पध्दत महापालिकेत काँग्रेसची सत्ता येईल.” संजय हेमगड्डी, सभागृह नेता, महापालिका, काँग्रेस

जिल्हाधिकाऱ्यांचा पत्रकारांना सल्ला
कल्याण-डोंबिविलीमहापालिकेच्या निवडणूक जाहिरातीत आयुक्तांचा फोटो वापरल्याच्या प्रश्नावर निवडणूक आयुक्त सहारिया यांनी ‘मला माहिती नाही, मी दौऱ्यावर होतो, मी माहिती घेतो’ असे उत्तर िदले. ते उत्तर देत असतानाच त्यावर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीविषयी विचारा, असा सल्ला पत्रकारांना दिला.

बनावट ओळखपत्र, कारवाईचे आदेश
माेहोळ तालुक्यात बनावट मतदार ओळखपत्र आढळून आले आहेत. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. यामध्ये काही जणांना अटक करण्यात आली आहे. तपासात सत्य समोर येईल. दोषीवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिली आहे, असेही सहारिया यांनी सांगितले.
माहिती देताना मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया. सोबत जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित गृहविभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी.