आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation School Number 27 Starts In Community Temple

महापालिकेची शाळा क्र. २७ भरतेय समाजमंदिरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेच्या मराठी शाळा क्रमांक २७च्या विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून इमारत नाही. पहिली ते चौथीचे वर्ग एका समाज मंदिरात (सभागृहात) भरवण्यात येत आहे. यात विद्यार्थ्यांचे हाल होत असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर दुष्परिणाम होत आहे. तसेच शिक्षकांनाही शिकवण्याकामी अडचणी येत आहेत. याकडे प्रशासन, शिक्षण मंडळ नगरसेवक यांचे दुर्लक्ष आहे.

महापालिकेने पुण्याच्या एका कंपनीला ‘बांधा, वापरा हस्तांतरण करा’ (बीओटी) या धोरणानुसार शाळेची जागा विकसित करण्यासाठी दिली. शाळेला पर्यायी जागा अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनमधील सभागृह देण्यात आले. पहिले ते चौथीपर्यंतचे ६५ विद्यार्थी एकाच वर्गात बसतात. तेथे शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे आदर्श सुविधा तर सोडाच साध्या प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. योग्य पर्यायी जागा देण्यात आली नाही.
ठरावाविरुद्ध निर्णय
२००२मध्ये महापालिका शाळांच्या जागा, संस्था अथवा कंपन्यांना विकसित करण्यासाठी देऊ नये, असा ठराव झाला आहे. तरीही चार-पाच वर्षांपूर्वी शाळा क्र. २७ ची जागा बीओटीवर देण्यात आली, हा मुख्य प्रश्न आहे. जरी दिली तर शाळेला योग्य पर्यायी जागा देऊन बांधकाम करण्यात येणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गाविना बसण्याची वेळ आहे.

राजकीय स्वार्थ
शाळा क्रमांक २७ मुळे अनेक विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. परंतु सत्ताधारी राजकीय नेत्याच्या स्वार्थापोटी शाळा हलविण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्याचे हाल होत आहेत. या शाळेचा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा होत होता. युवराज पवार, पालक

लवकरच मार्गी लागेल
‘बीओटी’तत्त्वावरदेण्यात आलेले काम चार वर्षांपासून सुरू आहे. परंतु पालिकेच्या नावावरच जागा नसल्याने काम करण्यास अडथळा आला होता. परंतु महिन्यापूर्वी उताऱ्यावर पालिकेचे नाव आले आहे. त्यानुसार काम सुरू केले तर सुरुवातीला शाळेचे काम करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येईल किंवा दोन्ही कामे एकदम सुरू करण्यास सांगितले जाईल. त्यामुळे लवकरच मुलांचा शाळा खोल्याचा प्रश्न मार्गी लागेल. अजीज चंदरगी, उप अभियंता,बीओटी, महापालिका

खोल्या देण्यास आयुक्तांचा नकार
चार वर्षांपूर्वीचे प्रकरण आहे. शाळा क्र. २७ ची जागा बीओटी तत्त्वावर दिली आहे, परंतु ज्या ठिकाणी काम सुरू त्याच्या पाठीमागील बाजूस दोन खोल्या आहेत. त्या खोल्या शाळेला द्या अशी मागणी करण्यात आली होती. परंतु त्यास आयुक्तांनी नकार दिल्याचे कळते. दोन खोल्या आहेत तिथे तारेचे कुंपण घालून दिल्यास ज्ञानार्जनाचे काम चांगल्या पद्धतीने होईल. विष्णू कांबळे, प्रशासनाधिकारी,महापालिका

... तर येते अडचण
गेल्या चार वर्षांपासून समाज- मंदिरात शाळा भरत आहे. तसेच समाज मंदिरात कार्यक्रम असतील तर अडचणी निर्माण होतात. शीतल पवार, शिक्षिका