आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेत १५ प्रकारच्या सुविधा आॅनलाइन सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर महापालिकेने आपला कारभार स्मार्ट करण्याच्या दृष्टीने दमदार सुरुवात केली आहे. मार्च २०१६ पासून जन्म-मृत्यू दाखले, ले-आउट, विवाह नोंदणी यासह विविध प्रकारच्या १५ सुविधा आॅनलाइन पद्धतीने देण्यास सुरुवात झाली आहे. या सुविधांसाठी आवश्यक असलेले शुल्क आॅनलाइन पद्धतीने डेबिट कार्डद्वारे करण्याची सोय आहे. याबद्दलची माहिती महापालिका संगणक विभागाचे प्रोग्रामर स्नेहल चपळगावकर यांनी दिली आहे.

महापालिकेत कामे वेळेवर होत नाहीत, अशी ओरड नेहमीच असते आणि तसा अनुभवही अनेकांना येत असतो. आता महापालिकेने आॅनलाइन प्रणाली सुरू केल्याने लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत शहरातील नागरिकांना आॅनलाइन सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेत एक मार्चपासून १५ प्रकारच्या सेवा आॅनलाइन देणे सुरू झाले आहे.
राज्यातील ३३ शहरांचा समावेश अमृत योजनेत करण्यात आला आहे. त्या शहरांमध्ये आॅनलाइन सेवा देणे शासनाच्या वतीने बंधनकारक करण्यात आल्याने सोलापुरात ही सेवा सुरू करण्यात आली. शहराची निवड स्मार्ट सिटी योजनेत झाल्यानंतर मनपातील सुविधा आॅनलाइन झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

rts.solapurcorporation.org वर करा अर्ज
शासनाच्याअापले सरकार या संकेतस्थळावर गेल्यावर आपले खाते उघडा. तेथे ओटीपी (एकवेळ कोड) येईल. त्यानंतर नगरविकास खात्यात जा. जिल्हा निवडा. त्यात सोलापूर महानगरपालिकावर क्लिक केल्यास १५ प्रकारची सर्व्हिसची यादी येईल. त्यातील आवश्यक असलेल्या सेवा निवडून त्यानंतर देण्यात येणाऱ्या सूचनेनुसार प्रक्रिया पूर्ण करा. महापालिकेच्या rts.solapurcorporation.org या संकेतस्थळावर जाऊन सुविधेचा लाभ घेता येईल.

या आहेत १५ सुविधा
जन्म-मृत्यूनोंदणी प्रमाणपत्र, मूल्यांकन दाखला, ना हरकत दाखला, विभागीय कार्यालयाचा दाखला, लेआउट - नकाशा, विवाह दाखला, मिळकत हस्तांतरण, मिळकत नाव नोंदणी, बांधकाम परवाना, प्लॅन सर्टिफिकेट, करांचा दाखला, नळ जोड, ड्रेनेज जोडणी, अग्निशमन दलाचे प्राथमिक आणि अंतिम ना हरकत प्रमाणपत्र आदी सोयी सुविधा आॅनलाइन प्रणालीने मिळतील.

दाखल्यांसाठी केवळ तीन अर्ज
महापालिकेत एक मार्च २०१६ पासून आॅनलाइन दाखले देण्याची सेवा सुरू केल्यानंतर शहरातील तिघांनी अर्ज केले. त्यांना दाखले देण्यात आल्याची माहिती संगणक विभागाचे बिरूदेव सरवदे यांनी सांगितले.

घरबसल्या मिळवा दाखले
महापालिका१५ प्रकारच्या सुविधा एक मार्चपासून आॅनलाइन द्वारे सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आॅनलाइन अर्ज केल्यास दाखले मिळतील. स्नेहल चपळगावकर, मनपा संगणक प्रोग्रामर

जन्म-मृत्यू दाखले १९९० पासून
महापालिकेतीलजन्म-मृत्यू दाखल्याचे संगणकीकरण १९९० पासून करण्यात आले. त्यावेळेपासूनचे दाखले आॅनलाइन घेता येईल. त्यापूर्वीचे दाखले महापालिकेत येऊन घ्यावेत. हे दाखले घेताना मनपातील रजिस्टर नंबर आवश्यक आहे. दाखल्यासाठी आॅनलाइन अर्ज केल्यावर महापालिका दाखला तयार करून आॅनलाइन देईल. पण त्याची सत्यप्रत पाहिजे असल्यास महापालिकेत यावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...