आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाने रोजंदारी, चालकांना कायम करावे यासाठी बेमुदत उपोषण सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेने रोजंदारी आणि वाहन चालकांना कायम करावे, या मागणीसाठी महापालिका कामगार संघटना कृती समितीने शुक्रवारपासून महापालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ५२१ कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी युनियनने केली आहे.
महापालिकेतील तीन हजार १०० कामगारांना कायम करण्याचा आदेश हायकोर्टाने दिला होता. महापालिकेस हे शक्य नसल्याने टप्प्याटप्प्याने कायम करण्याची तयारी महापालिकेने दर्शवली. सन २००१ ते २००३ मध्ये ५७२, २००८ मध्ये ८६४ कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले. त्यापैकी १९३ कामगार आणि ३३ वाहनचालक यांना कायम करणे आवश्यक असताना केले नाही. यासाठी कामगार संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला. सप्टेंबर २०१५ रोजी नगरविकास राज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी बैठक घेऊन विशेष बाब म्हणून कायम करण्याचा निर्णय दिला.
त्यानंतरही वारंवार पाठपुरावा केला. पण अद्याप त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही.
१९३ रोजंदारी आणि ३३ वाहनचालकांना कायम करावे या मागणीसाठी शुक्रवारपासून कामगार संघटनेच्या वतीने महापालिकेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. वाहनचालक विश्वनाथ स्वामी, बिगारी अशोक होवाळे यांनी आंदोलन सुरू केले. यावेळी संघटनेचे अशोक जानराव, प्रदीप जोशी, शेषराव शिरसट आदी ५० कर्मचारी आंदोलनात सहभागी होते.

१६ आॅगस्ट रोजी मुंडन
मागण्या मान्य झाल्यास १६ आॅगस्ट रोजी महापालिकेसमोर मुंडन आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी दिली.
डाॅ. आंबेडकर ट्रेड युनियनने ५२१ कर्मचारी कायम करण्याची मागणी करत असल्याचे अध्यक्ष भारत वडवेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. यासाठी पाठपुरावा केला असून, महापालिका सभागृहात एकमताने ठराव झाला आहे. तो शासनाकडे पाठवला असून शासनाकडे पाठपुरावा सुरू केल्याचे ते म्हणाले. अन्य संघटनांची मागणी २२६ जणांना कायम करण्याची आहे. परंतु, युनियनचा आग्रह ५२१ जणांना कायम करावे असा आहे. १५ आॅगस्टपर्यंत मागणी मान्य झाल्यास आंदोलन करणार असल्याचे वडवेराव यांनी सांगितले. सहा कामगार मृत झाले, काही कामगार बदली कामगार म्हणून सेवानिवृत्त होत आहेत, तरीही त्यांना कायम केले जात नाही. ५२१ जणांना कायम करावे, अशी मागणी असल्याचे वडवेराव म्हणाले. यावेळी युनियनचे संघटक पंडित जानकर, बापू सदाफुले, दविद गदम आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...