आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामलवाडी शिवारात मुलीसमोर आईचा खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी-दीडवर्षाच्या चिमुकली समोरच आईच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना गुरुवारी उघडकीस आली. यावेळी महिलेच्या मृतदेहापासून काही अंतरावर सदरील चिमुकली रडत असल्याच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या दृश्याने उपस्थितांचीही मने हेलावून गेली. ही घटना तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी शिवारात घडली.

तामलवाडी शिवारात गंजेवाडी मार्गावर असलेल्या हुजूर पटेल यांच्या शेतात लहान चिमुकली रडत असल्याचा आवाज गुरुवारी (दि.२३) सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास जवळून जात असलेल्या वाटसरूंना आला. त्यानुसार ग्रामस्थांनी शोध घेतला असता शेतामध्ये काही अंतरावर छोटेसे बाळ हालचाल करताना रडत असल्याचे आढळले. याचवेळी जवळच कोणीतरी झोपल्याचे जाणवले. त्यानुसार ग्रामस्थांनी जवळ जाऊन पाहणी केली असता एका २५ ते ३० वयोगटातील महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. सदरील महिलेच्या डोक्यात तोंडावर अज्ञात व्यक्तीने दगडाने घाव घातल्याने सदरील महिलेचा चेहरा ओळखणेही अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत जवळच साधारणत: एक ते दीड वर्षाची चिमुकली रडत होती.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तिथे असलेल्या चिमुकलीला ठाण्यात नेऊन महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. यावेळी महिलेजवळ मुुंबईच्या ज्वेलर्सचे नाव असलेली पर्स त्यामध्ये ४०० रुपये आढळून आले. तसेच महिलेच्या एका हातावर बदाम गोंदलेला आहे. अंगावर पिवळी-लाल रंगाची छापील साडी लाल रंगाचा ब्लाऊज आहे. महिलेचा रंग गोरा आहे. चेहरा डोक्यावर दगडाने घाव घालण्यात आल्याने ओळख पटविणे अवघड झाले आहे. गुरुवारी सोशल मीडियात याविषयी हळवळ व्यक्त होत होती.