आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नानी-नानी बाग, मंगल कार्यालय ‘बीओटी’वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सातरस्ता परिसरातील नानी-नानी बाग आणि रूपाभवानी मंदिर परिसरातील मंगल कार्यालय बीओटीवर देण्याचा प्रस्ताव नगरसेवकांनी महापालिका सभेपुढे आणला आहे. याशिवाय पत्रकार महापालिका कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणे, ईश्वरनगर जागेतील ओपन स्पेस जागा हंचाटे विद्यालयातील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी देण्याचा प्रस्ताव आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी बोलावण्यात आली आहे. त्यासाठी पुरवणी कार्यक्रमपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली.
नाना-नानी बाग महाराष्ट्र मायनाॅरिटी ट्रस्टला २९ वर्षे ११ महिन्यांच्या कराराने बीओटीवर देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक अनिल पल्ली, पीरअहमद शेख, मेघनाथ येमूल यांनी आणला आहे. महापालिकेकडे कामगार कमी आणि आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे कारण पुढे करत सहा एकरपैकी तीन एकर जागा संस्थेसाठी तर तीन एकर जागा नागरिकांसाठी विकास करण्याच्या प्रस्तावात नमूद आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील जागा आहे.
रूपाभवानी मंदिर परिसरातील महापालिकेचे मंगल कार्यालय भवानी पेठ, मराठा वस्ती परिसरातील बुरूड शक्ती नवरात्र मंडळास ९९ वर्षांसाठी देण्याचा ठराव विरोधी पक्षातील नगरसेवक संजय कोळी, नागेश वल्याळ, अविनाश पाटील, शोभा बनशेट्टी यांनी आणला आहे. त्यास सत्ताधारी पक्षाचे अनिल पल्ली, उदय चाकोते, पद्माकर काळे, राजकुमार हंचाटे, सुजाता आकेन यांचा पाठिंबा आहे.

पत्रकार मनपा कर्मचाऱ्यांच्या घरासाठी जागा
पत्रकारमनपा कर्मचाऱ्यांसाठी जुळे सोलापुरातील सोरेगाव येथील जागा देण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने आणला आहे. ही जागा अार्थिकदृष्ट्या दुर्बल आणि आश्रम लोकांसाठी आरक्षित आहे.

नगरसेवकांच्या शाळेस मैदान
प्रभागक्रमांक १९मधील ईश्वरनगरातील मोकळी जागा हंचाटे विद्यालय आणि हिंगलाजमाता मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहातील मुलांना खेळाचे मैदान म्हणून देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक राजकुमार हंचाटे, अविनाश बनसोडे आणि अनिल पल्ली यांनी आणला आहे.

बातम्या आणखी आहेत...