आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगार बेकार झाले तर कलेक्टर आॅफिस जाळीन - नरसय्या आडम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर शहरात ऐंशी हजार विडी कामगार महिला आहेत. धूम्रपानविराेधी नव्या कायद्यामुळे विडी व्यवसाय बंद पडला तर सर्व कामगार बेकार होऊन आत्महत्या करतील. हे कामगार बेकार झाले तर दिवसा जिल्हाधिकारी कार्यालय जाळीन. तसेच रेल्वे स्टेशनवर सर्व कामगारांसोबत बसून एकही रेल्वे सोलापुरात येऊ देणार नाही, असा खणखणीत इशारा माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी बुधवारी दिला.

लाल बावटा विडी कामगार युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. ‘विडी उद्योगावर होणारी धूम्रपान कायद्याच्या सूचनांची ८५ टक्क्यांची सक्ती ही तांत्रिकदृष्ट्या अमलात आणणे शक्य नाही. म्हणून त्यांना या सक्तीतून सवलत देऊन चाळीस टक्के पृष्ठभागावर सूचना देण्यासंबंधीची सवलत असावी. तसेच कारखानदारांनी जाहीर केलेले बेकायदेशीर बंद काळातील मजुरी कामगारांना मिळवून द्यावी’, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यानंतर झालेल्या सभेत आडम म्हणाले, ‘एक एप्रिलपासून जर विडी कारखाने कायमस्वरूपी बंद पडले तर सोलापुरात उद्रेक होईल. महात्मा गांधीजींबरोबर शहीद भगतसिंग यांची भाषासुद्धा आम्हाला येते. त्या वेळी माझा रक्त सांडेन, कॉँग्रेस गेल्यानंतर चांगले दिवस येतील, असे वाटले होते, मात्र हे सरकार तर भयानक आहे.

गुटखा आणि सिगारेटने देशभरात एका वर्षात नऊ लाख लोकांचा मृत्यू होतो. मग सरकार हे का बंद करत नाही? अपघाताने १४ लाख लोक मृत्युमुखी पडले म्हणून वाहन चालवायचे नाही का, रस्त्यावर फिरायचे नाही का?’ असा प्रतिप्रश्न आडम यांनी केला.