आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर साडीच्या कलाकुसरीची परंपरा लोप, राष्ट्रीय हातमाग दिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भारतात प्रत्येक प्रांतागणिक हातमागावर विणकामाच्या असंख्य परंपरा पाहायला मिळतात. वर्षानुवर्षांच्या अनुभव आणि प्रयोगामुळे या परंपरांमध्ये येथील विणकरांनी अलौकिक नैपुण्य मिळवले आहे. त्यावर देशोदेशीच्या कौशल्याचा प्रभाव पडून त्या आणखीनच बहरत गेल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या हातमागाच्या साड्यांची मागणी घटत आहे. काही परंपरा लोप पावल्या आहेत, तर काही लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. यांची मागणी कमी होण्याची अनेक कारणे आहेत. मिलमध्ये तयार होणाऱ्या स्वस्त साड्या हे त्याचे महत्त्वाचे कारण.
महाराष्ट्रात प्रामुख्याने पैठणी आणि डेक्कन साडी या परंपरा आहेत. पैठणी ही आधी राजे धनिकांचीच लाडकी होती. आजही बरीचशी स्थिती अशीच आहे. डेक्कन साडी म्हणजे महाराष्ट्रीय साडी, जिला आपण बोलीभाषेत इरकल साडी म्हणतो. प्रामुख्याने दक्षिण महाराष्ट्र उत्तर कर्नाटक या भागात ती विणली जायची. आज उत्तर कर्नाटकातील काही भागांमध्येच हिचे अस्तित्व शिल्लक आहे. तेही मुख्यत्वे यंत्रमागावरच. या साड्यांमध्ये रेशीम आणि सुतासोबत कृत्रिम धाग्यांचा वापर सुरू आहे.

ही डेक्कन साडी मुख्यत्वे करून महाराष्ट्रीय साडी म्हणूनच आेळखली जायची. याचेही खूप प्रकार अस्तित्वात होते. यातील काही प्रकार फक्त सोलापुरात विणले जायचे. या साड्या उत्तर भारतीय साड्यांपेक्षा खूप वेगळ्या दिसतात. यावर मुघल प्रभाव नाही. सोलापूरशिवाय विदर्भातील काही भाग मालेगावातही या साड्या विणल्या जायच्या. सोलापूर हे या साड्यांच्या उत्पादनाचे आणि बाजाराचे एक प्रमुख ठिकाण होते. आजही इरकलसाठी सोलापूरची बाजारपेठ नावाजलेली आहे. यांतील अंख, रूई फुल कणा काठाच्या साड्या या खास सोलापुरातच विणल्या जायच्या. या सर्व साड्यांमध्ये ‘टोप पदर’ हा घटक आहे, तोही लाल रंगात. या साड्या रेशमी, सुती निम रेशमी असायच्या. या साड्यांमधील गडद रंगही ओळख आहे. वैशिष्ट्यपूर्ण साडी आज सोलापुरातून, महाराष्ट्रातून लुप्त झाली आहे.

आज सोलापुरात काही मोजक्या हातमागांवर या साड्यांचेच आजचे स्वरूप असलेल्या “कोळी वाणाच्या” सुती साड्या, कृत्रिम धागेही सर्रास वापरले जातात. भारतात अनेक हातमाग परंपरांचे पुनरूज्जीवन होत आहे. यात काही जणांचे वैयक्तिक पातळीवरील प्रयत्न तर काही ठिकाणी सरकारी पातळीवरील प्रयत्न कामी येत आहेत. सोलापूर साडीसाठीही संघटित प्रयत्नांची गरज आहे. विणकरांची नवी पिढी तयार होण्यासाठी त्यांचा आर्थिक सामाजिक दर्जा उंचावला गेला पाहिजे. व्यावसायिक शिक्षणाद्वारे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. आपण सर्वांनी सोलापूर साडीला नवीन वैभव प्राप्त करून देण्याचे स्वप्न बघून त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
बातम्या आणखी आहेत...