आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरात्रोत्सवात नियोजनात्मक कामांनी आदर्श घडवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - आगामी नवरात्र महोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांची सोय व्हावी, यासाठी मंदिर परिसरातील रस्ते, विविध भाषेत फलक तयार करणे, ओळखपत्र अनिवार्य, पिण्याच्या पाण्याची सोय, राहण्याच्या सोयीसह इतर कामे करण्यासाठी मंदिर संस्थान, पोलिस आणि नगरपालिकेने समन्वयातून नियोजनबध्द काम करून आदर्श घडविण्याचे निर्देश श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात मंदिर संस्थानच्या वतीने नवरात्र महोत्सव पूर्वतयारीची बैठक बुधवारी (दि.८) पार पडली, यावेळी डॉ. नारनवरे यांनी वरील निर्देश दिले. यावेळी पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रियंका भगत (नारनवरे), मंदिर संस्थानचे तहसीलदार सुजित नरहरे, नगरपालिका मुख्याधिकारी राजीव बुबणे, पोलिस निरीक्षक ज्ञानोबा मुंडे, नायब तहसीलदार एन. एस. भोसीकर, आपत्ती व्यवस्थापन समितीच्या समन्वयिका वृषाली तेलोरे, मंदिर संस्थानचे दिलीप नाईकवाडी यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. नारनवरे म्हणाले की, नवरात्र महोत्सव काळात भाविकांची संख्या लक्षात घेता सर्व विभागांनी त्यांना दिलेल्या कामांबाबत जागरुक राहून जबाबदारी पार पाडावी, यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी एकाच ठिकाणी होऊ नये, यासाठी विविध ठिकाणी बॅरिकेटिंग करणे, ठिकठिकाणी स्वच्छता शौचालयाच्या सोयी पाणी उपलब्ध करून देणे, पार्किंग, नो पार्किंग झोन तयार करणे, यात्रेकरू ज्या ठिकाणावरून येणार आहेत त्या ठिकाणांचे नकाशे माहितीपत्रक तयार करून नियोजन करणे, स्पीड ब्रेकरवर झेब्रा कॉसिंग, अतिक्रमण हॉकर्स झोनबाबतीत दक्ष रहाणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करून अहोरात्र दक्ष ठेवणे, महाराष्ट्र कर्नाटकमधून येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी आवश्यक बसच्या फेऱ्या वाढविणे, नियंत्रण कक्ष स्थापन करणे, नंबरप्लेट नसलेल्या गाड्यावर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.

मंदिर परिसर सुसज्ज करण्याच्या सूचना
मंदिर परिसरात विद्युतपुरवठा, कंट्रोल रुम, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत विशेष प्लॅन तयार करणे, ट्रॉफिक प्लॅन तयार करणे, रस्ते, पाणी व्यवस्था, ओलसर ठिकाणी मॅट टाकणे, जागोजागी स्क्रीन लावणे, ॲम्ब्युलन्स, डॉक्टर क्लिनिक / हॉस्पिटल २४ तास चालू ठेवणे, आरोग्यविषयक सुविधा पुरविणे आदी विषयांबाबतही निर्देश दिले आहेत.

मंदिरात अनधिकृत पुजाऱ्यांवर बंदी
यात्रेकरूपुजारी मंडळीच्या घरी राहतात, त्यांची त्या पुजाऱ्यांनी यादी करून मंदिर संस्थानास माहिती देणे, घडीपुस्तिका, धार्मिक वातावरण निर्माण होण्यासाठी ठिकठिकाणी स्पीकर लावणे, देवीचे पावित्र्य राखण्यासाठी अन्य पुजाऱ्यांना अनधिकृत पुजाऱ्यांना बंदी घालण्याचे सूचवले आहे.

विकास कामांची पाहणी
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी तुळजापूर विकास प्राधिकरणा मार्फत होत असलेल्या विविध कामांची पाहणी करून तत्काळ कामे पूर्ण करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले.