आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णसेवेला नाही विराम, कसलं आलं हो आराम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - दिवस-रात्ररुग्णसेवेत जातो. सुटी नाही की रजा नाही. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी सारे काही सहन करावे लागते. कधी रुग्णाचे नातेवाइक रागावतात तर कधी रुग्णच संतापतो. त्यांना समजून घेणे एवढाच पर्याय असतो. कारण त्यांच्या वेदनाच बोलत असतात, सांगत होत्या रुग्णालयांमधल्या आयाबाई. नवरात्रनिमित्त ‘दिव्य मराठी’ने आयोजित केलेल्या ‘टॉक शो’मध्ये सोमवारी खासगी रुग्णालयातील आया सहभागी झाल्या होत्या. परिस्थितीशी सामना करताना कटू अनुभव येतात. पण, त्याने खचून जाता येणार नाही. कुटुंब सावरण्यासाठी पळापळ करावीच लागते, असे त्यांचे म्हणणे आहे.

परिस्थितीमुळे मुले शिकली नाही
छायालक्ष्मण गायकवाड : गेले१४ वर्षे झाली अायाचे काम करत आहे. मालक रिक्षाचालक अाहेत. परिस्थिती हलाखीची असल्याने मुलांना शिक्षण घेता आले नाही. मोठा मुलगा नववी शिकून रिक्षा चालवण्याचे काम करतो. दोन्ही रिक्षा भाड्याच्या आहेत. घरही भाड्याचे. त्यामुळे मिळालेल्या उत्पन्नातून देणी वजा जाता फार काही उरत नाही. दोनवेळचे जेवण तेवढे मिळते. भविष्याची तरतूद तर दूरच आहे. आमच्यासाठी कसलीही शासन योजना नाही. त्यामुळे आमच्या व्यथांची जाणीव करून देण्याचे माध्यमही नाही. या स्थितीचा कोणीच विचार करत नाहीत. काही वेळा रुग्णांच्या नातेवाइकांकडून बोलणी खावी लागते.

वडिलांबरोबर गाडी ढकलली
पार्वती त्र्यंबक शिंगाडे माझाजन्म सोलापूरचा. वडील टिळक चौकातील गादी कारखान्यात हातगाडी आेढायचे. त्यांच्या सोबत मीही ढकलण्यास जायचे. या कष्टाची जाण म्हणून वडिलांनी घर दिले. मालकांच्या डोळ्यांना दिसत नाही म्हणून ते घरीच बसले. मुलगा दहावी झाला. मेकॅनिकलची कामे करतो. सूनबाई एका डॉक्टरांकडे स्वयंपाकाला जाते. दुसरा मुलगा पुण्यात असतो. त्याने आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. कमावती माणसे मिळाल्याने संसाराचा गाडा थोडासा मार्गी लागला. तरी आयुष्याची पुंजी जमवण्यासाठी इतर ठिकाणीही प्रसूती करण्यासाठी पळत असते. बाळांचे मॉलिश, आंघोळी याचीही काम करते. त्यातून काही पैसे मिळतात.

मालक गेले, कुटुंब सावरले
संगीता सदाशिव कदम : मालकवाहनचालक होते. तीन वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे कुटुंब सावरण्याकरता मला बाहेर पडावे लागले. पांजरपोळ चौकातील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आया आहेे. तेथे चांगला पगार मिळतो . सुट्या, रजाही देऊ लागले आहेत. दोन मुलांचा विवाह केला आहे. स्वत:चे घर उभे केले. हे सर्व करण्यास कष्ट करावे लागले. रुग्णालयात कर्करुग्णांची स्थिती पाहवत नाही. त्यांच्या वेदना कानावर आदळतात. रोजच असे विदारक चित्र पाहण्याची आता सवय झाली आहे. रुग्णांची सेवा करताना, त्यांच्याशी चार गोष्टी बोलते. त्यांच्या नातेवाइकांना दिलासा देण्याचे काम करते.