आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्शी पाणीपुरवठा: सौरऊर्जा यंत्रणेला मंजुरी देण्यास राष्ट्रवादीचा विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कंदर, कुर्डुवाडी नागोबाची वाडी येथे तीन कोटी रुपयांची सौरऊर्जा यंत्रणा बसवण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी देण्यास विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विरोध केला. त्यामुळे कनिष्ठ लिपिकाने मूळ विषयात केलेल्या बदलाचे वाचन केले आणि सूचनांची दुरुस्ती केल्याची घोषणा करण्यात आली. तसेच भाजीविक्रेते, हातगाडीवाले यांच्याकडून पाच रुपयांऐवजी २५ रुपयांच्या वसुलीचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला. 

बुधवारी (दि. ३) दुपारी पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष अॅड. असिफ तांबोळी यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा झाली. माजी उपनगराध्यक्ष सुमतीलाल बदलोटा यांना श्रद्धांजली वाहून सभेला सुरुवात झाली. सभेसमोर १७ विषय ठेवण्यात आले. नगरोत्थान योजेंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी कंदर, कुर्डुवाडी नागोबाचीवाडी येथे तीन कोटींची सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यास प्रशासकीय मंजुरी द्यायला विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी विरोध केला. याला सभेची मान्यता घेण्यापूर्वी त्याचे अंदाजपत्रक कुठे आहे, शासन मंजूर दर (डीएसआर) कशाच्या आधारे ठरवले, सर्वसाधारण सभेने केवळ तीन कोटी रुपयांच्या आकड्याला मंजुरी द्यायची का, असा सवाल करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. त्यावर विद्युत विभागाचे प्रमुखांचा खुलासा मागण्यात आला. मुख्याधिकाऱ्यांनी सरकारकडून मंजूर दरपत्रक मिळेल असे सांगितल्याने तीन कोटींचा आकडा नमूद केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शहरात असूनही सभेला अनुपस्थित मुख्याधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील यांच्याकडे चर्चेची दिशा वळली. 

चूक लक्षात आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी मूळ विषयात केलेल्या बदलाचे लिपिकाला वाचन करावयास लावले. त्यात सल्लागार नेमणुकीचा विषय घालण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यास प्रशासकीय मंजुरीऐवजी सल्लागार नेमण्यासाठी असा विषय असल्यास त्याला मान्यता देत असल्याचे जाहीर केले. आगळगाव रस्ता ते अरणगाव रस्ता आणि आगळगाव रस्ता ते तुळजापूर रस्त्यापर्यंतच्या ३० मीटर रुंदीच्या रस्त्यांच्या भूसंपादन आणि पोस्ट कार्यालय चौक ते सोलापूर रस्त्यावरील उड्डाण पुलापर्यंतचा रस्ता हस्तांतरणास राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला. यापूर्वीही रस्ते भूसंपादनाचे विषय आले होते. परंतु भूसंपादनाचा मोबदला देण्याची नगरपरिषदेची आर्थिक क्षमता नसल्याने ते बारगळले. पूर्वी दरमहा पाच तारखेच्या आत कर्मचाऱ्यांचे वेतन व्हायचे. आता २७ तारखेनंतरही वेतन होत नाही. शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन होत नाही, याकडे लक्ष वेधत विरोधकांनी रस्ता हस्तांतरणास विरोध केला. 

दारू दुकाने वाचवण्याचा प्रयत्न 
रस्ताहस्तांतरणामागे दारू दुकाने, बिअर शॉपी वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही विरोधकांनी केला. सुशोभीकरण आणि दुभाजकासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाही रस्ता हस्तांतरणाची मागणी केली होती, असे सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यावर रस्ता नगरपरिषदेकडे वर्ग करण्याची नव्हे तर केवळ अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी दुभाजकासाठी परवानगी मागण्यात आली होती, असा खुलासा अक्कलकोटे यांनी केला. 
बातम्या आणखी आहेत...