आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Leader Sharad Pawar Offer To Congress For Alliance At Maharashtra

बिघाडीतून आघाडीकडे: आता तरी एक होऊया; पवारांची काँग्रेसला हाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आघाडीत असताना एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात देश व राज्यातील सत्ता गमावणाऱ्या, अगदी विरोधी पक्षनेते पदासाठीही एकमेकांना ‘धोबीपछाड’ देण्यासाठी डाव टाकणाऱ्या काँग्रेस- राष्ट्रवादी या एकेकाळच्या मित्रपक्षांना आता पुन्हा एकत्र येण्याची गरज वाटू लागली आहे.

‘सत्ताधारी युतीत भांडणे आहेत, सरकार काम करीत नाही, शेतकरी अडचणीत आला आहे,’ असे सांगत ‘आता बदल घडविण्यासाठी आपण एकसंध राहिले पाहिजे,’ अशी साद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी काँग्रेस नेत्यांना घातली.

पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन, सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ सोहळा शुक्रवारी दुपारी पार पडला, त्यावेळी पवार बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील यांच्यासह दोन्ही काँग्रेसचे दिग्गज नेत्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

गेली पंधरा वर्षे सत्तेत एकत्र ‘संसार’ करणाऱ्या काँग्रेस- राष्ट्रवादीने यंदा लोकसभा आणि विधानसभा स्वतंत्रपणे लढवून भाजपच्या हाती आयती सत्ता दिली. देशभर मोदींचा प्रभाव वाढत असल्याने मात्र आता या दोन्ही पक्षांना अस्वस्थ वाटू लागले आहे. त्यातच दिल्लीपाठोपाठ बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला दणका बसल्याने व महाआघाडीची सरशी झाल्याने महाराष्ट्रातही पुन्हा दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपविरोधात एकत्र येण्याची तयारी सुरू केली आहे. शुक्रवारच्या कार्यक्रमात तर आघाडी सरकारमध्ये दोन्ही काँग्रेसने सत्तेत असताना कशी चांगली कामे केली, असे सांगत एकमेकांचे कौतुक करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. सोबत भाजप सरकारवर टीकेची झोडही उठवली जात होती. पवार- चव्हाणांच्या बदलत्या भूमिका पाहून उपस्थितांच्या मात्र भुवया उंचावल्या होत्या.

उद्योजकांना सावरणारे सरकार शेतकरीप्रश्नी उदासीन : शरद पवार
‘केंद्र सरकार मूठभर पोलाद उद्योगपतींना ६० हजार कोटींचे पॅकेज देऊन सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, लाखो शेतकऱ्यांशी संबंधित साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी १३ हजार कोटींच्या पॅकेजविषयी ठोस निर्णय घेत नाही. केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका शेतकरीविरोधी आहे,’ अशी टीका शरद पवार यांनी केली. अडचणींमुळे केवळ साखर कारखानदारीच नव्हे तर देशातील शेती अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. सर्वत्र मंदी आहे. शेतमाला योग्य भाव नाही.पिकांच्या उत्पादनाचा खर्च वाढला. परंतु त्या तुलनेत दरात वाढ नाही. यातील फरकाचा विचार केंद्र सरकार करत नाही,’ असा आरोप पवारांनी केला. पाण्याविषयी ते म्हणाले, ‘केंद्र व राज्य सरकारने पिण्याच्या व शेतीच्या पाण्याविषयी योग्य भूमिका घ्यावी. सध्या पाण्यासाठी सुरू असलेले वाद टाळायला हवेत. पिण्यासाठी पाणी सोडताना त्याकडे प्रत्येकाने मानवतेच्या भावनेतून पाहावे.’

संघाचे कार्यकर्ते देतात अधिकाऱ्यांना आदेश : चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. ‘आज देशात प्रचंड गंभीर परिस्थिती आहे. राज्यात पाणीसाठा मर्यादित आहे. पिण्यासाठीही हा साठा पुरेल का नाही अशी गंभीर स्थिती आहे. पाण्यासाठी वाद होत आहेत. हा प्रश्न न्यायालयात गेला आहे. अशाप्रसंगी सरकारकडून असलेली नेतृत्वाची अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. जून २०१३ मध्ये राज्यात नऊ लाख ८० हजार जनावरे छावण्यांमध्ये होती. पाच हजार ४०० टँकर सुरू होते. मात्र, आज नऊ - दहा व ६००-७०० टँकर सुरू आहेत. प्रशासन आघाडीधार्जिणे असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात. याचा अर्थ त्यांचा अधिकाऱ्यांवर विश्वास नाही. संघ कार्यकर्त्यांच्या खासगी ओएसडी म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. ही मंडळी सरकारी अधिकाऱ्यांना आदेश देतात, ही बाब चिंताजनक आहे,’ असे चव्हाण म्हणाले. तर माजी सहकार मंत्री व कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘ सध्याचे राज्यातील सरकार हे आंधळे, बहिरे आहे. जनतेच्या समस्या त्यांना ऐकू येत नाहीत. त्याविरुद्ध आक्रमक होण्याची गरज आहे, त्यामुळे हा मेळावा सरकारविरोधी आंदोलन सुरू करण्याची नांदी ठरावा.’

देशाचा विकास दर आता घसरला : सुशीलकुमार
आम्ही सत्तेत असताना देशाचा विकास दर ८ टक्क्यांच्या वर गेला होता, त्यावेळी आम्ही वीजनिर्मिती, कृषी अशा क्षेत्रात चांगले काम केले होते. पण आज विकास दर साडेचार टक्क्यांवर आला आहे. शेतकरी अडचणीत आहे, जनावरांसाठी एकही छावणी नाही, अधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंत निर्णय होत नाहीत. त्यामुळे हे सरकार काय करते, असा प्रश्न माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित केला.

गुजरातने पळवले आमचे उद्योग : अशोक चव्हाण
गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत येऊन महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवून नेत आहेत, अन् महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र परदेशात जाऊन गुंतवणुकीसाठी प्रयत्न करताहेत. त्यामुळे राज्यातील आहे ते उद्योग तर जात आहेतच पण नवीन गुंतवणूकही काही होत नाही, असे सध्याचे राज्याचे चित्र आहे, अशा शब्दात खासदार अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस व युती सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला.