आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र आणि राज्यातील भाजपचे सरकार सर्वसामान्यांचे नव्हे, तर धनदांडग्याचे; राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ‘एकही भूल कमल का फुल’,“अच्छे दिन आने वाले है, मोदीजी जाने वाले है’, ‘भाजप सरकार मजेत मस्त, सामान्य जनता त्रस्तच त्रस्त’, ‘जनता उपाशी सरकार तुपाशी’, ‘भाजप सरकार नव्हे ब्लू व्हेल गेमच’, ‘शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे’, हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन?’ आदी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चात शनिवारी ऐकू आल्या. 
 
इंधन दरवाढ, भारनियमन, शेतकरी आत्महत्या, गॅस दरवाढ, सोलापुरातील मिनी आणि मेजर गाळेधारकांना रेडीरेकनर दराप्रमाणे भाडे आकारणी करावी, सध्याचे गाळे त्यांना कायमस्वरूपी विकत देण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा, स्मार्ट सिटीच्या नावाखाली सोलापूरकरांची सुरु असलेली फसवणूक, आरोग्य सेवेचा उडालेला बोजवारा आदी मुद्द्यांवर भाजप आणि केंद्र, राज्य महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना घेरण्यात आले. भाजप सरकारची पोलखोल करणारी फलके हाती धरलेले कार्यकर्ते ‘भाजप सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देत होते. 
 

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता चार हुतात्मा पुतळा परिसरातून मोर्चा निघाला. तो जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. प्रभारी निवासी जिल्हाधिकारी रेश्मा माळी यांना शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. तत्पूर्वी झालेल्या भाषणात श्री. जाधव, श्री. पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, दिलीप कोल्हे, राजन जाधव, दिनेश शिंदे, अशोक मुळीक, निर्मला बावीकर आदींनी टीका करत भाजप सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केला. भाजप सरकार गरिबांचे सरकार नसून ते धनदांडग्यांचे सरकार आहेत. घोषणाबाज सरकारमुळे अच्छे दिन नव्हे तर बेकार दिन आल्याचा आरोप पवार यांनी केला. 
 
मोर्चा माजी महापौर जनार्दन कारमपुरी, सुभाष पाटणकर, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, पद्माकर काळे, प्रदेश महिला उपाध्यक्ष विद्या लोलगे, चंद्रकांत पवार, महिला जिल्हा निरीक्षक निर्मला बावीकर, नगरसेविका सुनीता रोटे, लता ढेरे, बिस्मिल्ला शिकलगर, सुवर्णा जाधव, मंगला कोल्हे, रेखा सपाटे, मनीषा नलावडे , सुनंदा साळुंखे, आनंद मुस्तारे, मनोज गादेकर, दीपक राजगे, शंतनू साळुंखे, ज्ञानेश्वर सपाटे, पीरअहमद शेख, युवराज राठोड, हरिदास गायकवाड, प्रशांत बाबर, डॉ. बसवराज बगले, जनार्दन बोराडे, जावेद खैरदी, प्रमोद भोसले, दिनेश शिंदे, सिकंदर गोलंदाज, व्यापारी असोसिएशनचे अशोक मुळीक, राजू आहुजा, राजू राजानी, विशाल देढीया, राजू पत्की, विलास लोकरे, शाम गांगर्डे, मनीषा माने आदी सहभागी होते. कार्यकर्त्यांत उत्साह दिसून आला. 
 
 
सरकारच्या ओझ्याखाली सामान्य माणूस दबला ! 
नोटबंदी , जीएसटी, इंधन दरवाढ, शेतकरी आत्महत्या, महागाई, गॅस दरवाढ या सरकारने लादलेल्या ओझ्याखाली सामान्य माणूस दबला गेला आहे. शेतकरी पिचून गेला आहे. या सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येकी एक गाठोडे एका हातगाडीवर ठेवून आणि त्यावर अच्छे दिनचा फलक लावून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हातगाडी ओढून सोलापूरकरांचे लक्ष वेधले. 
 
चुलीवर भाकरी करून गॅस दरवाढीचा अनोखा निषेध ! 
गॅसचे दर वाढल्याने गृहिणींचे किचन बजेट कोलमडले आहे. महागाईचा स्फोट झाला असून आता गॅसवर नव्हे तर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ गृहिणींवर आणली आहे . या गॅस दरवाढीचा निषेध म्हणून महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी करून आणि पदाधिकाऱ्यांनी भाकरीसोबत खर्डा खाऊन केंद्र राज्य सरकारचा निषेध केला. 
बातम्या आणखी आहेत...