आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीकडून नोटाबंदीचे श्राद्ध; मुंडन करून पिंडदान, कावळ्यालाही सुगावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी सकाळी गणपती घाटावरील दशक्रिया विधीच्या ठिकाणी भाजप सरकारच्या नोटाबंदीचे वर्षश्राद्ध घालून पिंडदान करण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांचे मुंडन करून भाजप सरकारच्या तीन वर्षांच्या सुमार कामगिरीच्या विरोधात निदर्शनेही करण्यात आली. 
 
केंद्र राज्य शासनाचा निषेध करताना नेत्यांनी मोठी उपस्थिती लावली खरी. पण प्रत्यक्षात मात्र दोन कार्यकर्त्यांचे मुंडन करण्यात आले. हे आंदोलन कार्यकर्त्यांचे मुंडन करून "भाजप सरकार हाय हाय, पुढच्या वर्षी बाय बाय, भाजपचे तीन साल महाराष्ट्र बेहाल'च्या घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. 
 
३० ऑक्टोबरला राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे ३० तारखेपासून नोव्हेंबरपर्यंत राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीतर्फे आंदोलने करण्यात येत आहेत. नोटांचे छायाचित्र असलेल्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रकाश जाधव आणि दीपक इरवडकर या कार्यकर्त्यांचे मुंडनही करण्यात आले. नंदू पाठक आणि रमेश पाठक यांनी पौरोहित्य केले. सरकारने घाईघाईत कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटण्याचा कार्यक्रम उरकला. मात्र ज्यांना प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या खात्यात अजूनही रक्कम वळती झालेली नाही. दिवाळी सुखात जाईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली होती. मात्र या नाकर्त्या सरकारमुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे, अशी खंत शहराध्यक्ष भारत जाधव यांनी व्यक्त केली. 
 
सरकारच्या नाटकीपणाचा कळस झाला आहे. कोरी प्रमाणपत्रे देऊन सरकारने कर्जमाफीचा इव्हेंट केला आहे. जलयुक्त शिवार योजना गाळयुक्त शिवार बनली आहे. चार महिन्यांतच सुमारे ४५ लाख लोकांचे रोजगार गेल्याचा अहवाल चिंताजनक आहे. याला सर्वस्वी भाजप सरकारच जबाबदार आहे. अशी राज्याची स्थिती असताना सरकार उत्तम कामगिरी करीत असल्याचा डांगोरा पिटत आहे, असा आरोप कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केला. 
 
याप्रसंगी माजी महापौर मनोहर सपाटे, जनार्दन कारमपुरी, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी गटनेते पद्माकर काळे, राजन जाधव, सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, राजू कुरेशी, नगरसेविका सुनीता रोटे, बिस्मिल्ला शिकलगार, लता ढेरे, मनीषा नलावडे, सायरा शेख, विठ्ठलसा चव्हाण, बशीर शेख, जनार्दन बोराडे, प्रशांत बाबर, आनंद मुस्तारे, जावेद खैरदी, महेश निकंबे, मल्लेश बडगू, सुहास कदम, प्रकाश जाधव, दिलावर मणियार, प्रवीण साबळे, युवराज राठोड, अमीर शेख, बालाजी सगलोर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते  
 
मोदींनी कावळ्यांनाही केले मॅनेज? 
संतोषपवार भारत जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनोख्या पिंडदान आंदोलनानंतर कावळ्याने घास शिवावा यासाठी प्रतीक्षा करावी लागली. या वेळी उपस्थित कार्यकर्ते नेत्यांनी मोदींनी कावळ्यांनाही मॅनेज केले का? अशी चर्चा रंगली. १० मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर एक कावळा आला, तोही एका पायाने लंगडा असलेला. त्याने लंगडत लंगडत येऊन घास शिवला. यानंतर बाकीच्या कावळ्यांनी घास शिवला. मात्र या अनोख्या आंदोलनाची चर्चा रंगली.
 
'फेक इन महाराष्ट्र' सरकार 
२०१४च्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यातील १८३ आश्वासनांपैकी एकूण १४८ आश्वासनांबाबत आजपर्यंत सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. ३५ आश्वासनांबाबत आजपर्यंत सरकारने फक्त सुरुवात केली आहे. फडणवीस सरकारच्या तीन वर्षांतील कामगिरीचे मूल्यमापन करणे अवघड बनले आहे. एकूणच भाजपच्या प्रगती पुस्तकावर अपयशाची तीन वर्षे असाच शेरा या सरकारबाबत मारावा लागेल. एकूणच मेक इन महाराष्ट्र नव्हे तर "फेक इन महाराष्ट्र' असल्याचे कार्याध्यक्ष पवार यांनी स्पष्ट केले. असे या सरकारचे काम सुरू असल्याचा आरोपही कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केला. 
बातम्या आणखी आहेत...