आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी महिलांची दोन आंदोलने, समन्वयाअभावी विस्कळीतपणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पक्ष एकच, गॅस दरवाढ विषय एकच, असे असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने दोन वेगवेगळी आंदोलने करून गॅस दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला शहर काँग्रेसच्या वतीने चुली वाटून निषेध करण्यात आला. तर ग्रामीण महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घरगुती गॅसदरात वाढ झाल्याने गॅसची टाकी आणण्यात आली. शहराचे आंदोलन नगरसेविका सुनीता रोटे यांच्या तर ग्रामीणचे आंदोलन महिला जिल्हाध्यक्ष मंदा काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. निदर्शनानंतर जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
 
शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तासभर घोषणाबाजी आणि निषेघ करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शहराचे आंदोलन झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ग्रामीण महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले. तासभराच्या अंतरात राष्ट्रवादी शहर जिल्हा महिलांच्या वतीने दोन वेगवेगळी आंदोलने करून गटबाजीचे दर्शन घडवले. शहराच्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष विद्या लोलगे, मंगला कोल्हे, लता ढेरे, मनीषा नलावडे, सुनंदा साळुंखे, सायरा शेख, गौरम्मा कोरे, मुक्ताबाई कारंडे, कमल गायकवाड, शिया मुलानी, संगीत सोनवणे, उज्ज्वला भोसले, मनीषा घोडके, छाया पवार, लक्ष्मी केदार, प्रमिला वाघमारे, अनिता मठपती, स्मिता तोडकर, पुष्पा चव्हाण, जया साबळे, संगीता आनुषे यांचा सहभाग होता.
 
‘अच्छे दिन नही चाहिए...’
मोदीसरकारने जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून गरीब जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. गॅस दरवाढीने गृहिणींचे किचन बजेट कोलमडून पडले आहे.वापस करो, वापस करो, पुराणे दिन वापस करो, नही चाहिए, नही चाहिए, मोदी के अच्छे दिन नही चाहिए, गॅस दरवाढीचा धिक्कार असो आदी भाजप सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.
 
चुली वाटप करून केला निषेध, १९ वेळा केली गॅस दरवाढ
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने पूर्वीच्या सरकारने गॅस ३५० रुपये करण्यासाठी ४० ते ५० वर्षे घेतली. मात्र मोदी सरकारने ३५० रुपयांचा गॅस वर्षांत तब्बल ७०० रुपये करून गरीब जनतेला उद््ध्वस्त करण्याचा पराक्रमच केला आहे. गॅसवरील सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतल्यापासून आजपर्यंत १९ वेळा दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा गॅसवर नव्हे तर चुलीवरच स्वयंपाक करण्यास मोदी सरकारने भाग पडले असल्याने चुली वाटप करून मोदी सरकारचा निषेध नोंदवला असल्याचे नगरसेविका सुनीता रोटे यांनी सांगितले.
 
ग्रामीण महिला संघटनेचेही निदर्शने...
शहरमहिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनानंतर ग्रामीणच्या महिला जिल्हाध्यक्ष मंदा काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅसदरवाढीविरोधात निदर्शने केली. यानंतर जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी साधना राऊत, रंजना हजारे, अनिता पवार, गोकर्णा डिसले, उषा गरड, मंगल खाडे, चारूशिला कुलकर्णी, वनिता वाघ, जयश्री पाटील, हसिना मुलाणी आदींची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...