आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात वाहतूकदारांकडून नियमांची पायमल्ली, विद्यार्थी सुरक्षितता धोक्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - शहरासह तालुक्यातील सर्वच ठिकाणी या साेबत ग्रामीण भागात विद्यार्थी वाहतूकदार नियमांची पायमल्ली करत आहेत. ग्रामीण भागात तर कोणत्याही यंत्रणेचे लक्ष नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शहरासह अन्य ठिकाणी शाळांकडून पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचा लोंढा थेट रस्त्यावर येत आहे.
पोलिस, उपप्रादेशिक परिवहन विभाग तसेच अन्य जबाबदार यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूलबस, व्हॅन अन्य वाहनधारकांकडून नियमभंगाचा कळस होत आहे. इंग्रजी शाळांचे पेव शहरांसह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पसरले आहे. तालुकास्तर मोठ्या गावांमध्ये अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मोठी क्रेझ आहे. प्रत्येक शाळांकडून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, यांच्याकडून नियमांचा भंग होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.
उस्मानाबाद शहरात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून परवाना घेतलेली वाहने वाहतूक करत आहेत. मात्र, ग्रामीण भागात काळीपिवळी, टमटमचा उपयोग विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी केला जात आहे. वैयक्तिक प्रवासासाठी वापरण्यात येणारी वाहनेही विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरली जात आहेत. अग्निरोधक यंत्र, केअरटेकर कर्मचारी तर सोडाच या वाहनांची मूलभूत व्यवस्थाही चांगली नाही. अत्यंत खिळखिळी झालेली वाहने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येत आहेत. काही वाहनांची तर कालबाह्यताही संपलेली आहे. खिडक्यांना काच नसलेली, अनेक ठिकाणी तुटलेली वाहने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला वापरली जात आहे. उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी, कोंड, तेर, वाघोली, काजळा, येडशी, कसबेतडवळे आदी भागांमध्ये अशी वाहने विद्यार्थ्यांची वाहतूक करताना दिसत आहेत. या साेबतच तुळजापूर, परंडा, भूम, उमरगा, कळंब, वाशी, लोहारा तालुक्यात सर्वत्रच अशा वाहनांमधून विद्यार्थ्यांचा प्रवास होत आहे. अनेक लहान मोठे - अपघात ग्रामीण भागात घडतात. विद्यार्थी जखमीही होतात. मात्र, असे अपघाताचे प्रकार समोर येऊ दिले जात नाहीत. पालकांसोबत मांडवली करून प्रकार दाबले जात आहेत. ग्रामीण भागात अशीच स्थिती राहिली तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भरमसाठशुल्क : शहराप्रमाणे तालुका ग्रामीण भागातील शाळा विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या नावाखाली पालकांकडून भरमसाठ शुल्क उकळतात. परंतु त्या तुलनेत व्यवस्था करत नाहीत. यामुळे संस्थाचालक गबरगंड झाले असून त्यांचीही आयकर खात्यामार्फत चौकशी करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.

तुळजापूर येथे आठ महिन्यांपूर्वी स्कूलबसमधून पडून विद्यार्थी जखमी झाला होता. संबंधित शाळाही अनाधिकृरीत्या हलवल्याची बाब समोर आली होती. यासाठी काही संघटनांनी आंदोलनही केल्यावर शिक्षण विभागाने सुरुवातीला अहवाल मागविले. परंतु कारवाईकडे विभागाचा कानाडोळा झाला आहे. तामलवाडी येथेही त्या अगोदर एका विद्यार्थ्याला प्राण गमवावे लागले. याचीही काहीच चौकशी झाली नाही.

कारवाईकडे कानाडोळा पार्किंग व्यवस्था नाही
शहरातील बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्थाच नाही. प्रतिथयश शाळांचीही अशीच अवस्था आहे. यामुळे थेट रस्त्यावरच विद्यार्थ्यांचा लोंढा येत असतो. शहरातील शहर पोलिस ठाण्यापासून ते बार्शी नाक्यापर्यंत परत तेथून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीपर्यंत सर्वच शाळांसमोर विद्यार्थी असतात. विशेष म्हणजे या रस्त्यावर मोठी वाहतूक असते. यामुळे सातत्याने लहान मोठे अपघात होतात.

अल्पवयीन चालक
कळंबउमरगा भागात अल्पवयीन चालक वाहन चालवत आहेत. त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवानाच नाही. टमटम अाॅटोरिक्षांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक हाेत आहे. यामुळे या भागात तर अपघाताचा अधिक धोका वाढला आहे. याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
बातम्या आणखी आहेत...