आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिद्धेश्वर’च्या चिमणीने रोखली सोलापूरची ‘उडाण’; अन्य शहरांतून विमान वाहतूक होणार सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी अडसर ठरल्याने सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यास डेक्कन चार्टरने असमर्थता दर्शवल्याने केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने उडाण योजनेतून सोलापूरला वगळल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांत चिमणीचा अडसर दूर करू, उडाणमधून सोलापूरचे नाव वगळू नये, अशी विनंती मुंबईत यासंदर्भात बुधवारी झालेल्या बैठकीत केली. हवाई मंत्रालयाने मात्र याबाबतच कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. 


उडाणअंतर्गत डिसेंबरअखेर राज्यातील कोल्हापूर, नाशिक, जळगाव सोलापूर या शहरांतून विमानसेवा सुरू होईल, असे यापूर्वी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्री तथा विमानतळ विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्राधिकरणची बैठक बोलावली होती. या वेळी विमानतळांचा विकास सेवा या विषयी चर्चा झाली. सोलापूर वगळता इतर शहरांची सेवा डिसेंबरअखेर सुरू होत असल्याचे स्पष्ट झाले. 


अन्य शहरांतून सुरू, सोलापूरचे काय? 
केंद्र सरकारने २०१६ मध्ये उडाण योजनेत महाराष्ट्रातील शिर्डी, नांदेड, कोल्हापूर, नाशिक, जळगाव सोलापूर या शहरांचा समावेश केलेला अाहे. यापैकी शिर्डी नांदेड शहरांतून विमानसेवा सुरू झाली. नांदेड विमानतळावरून सध्या दोन शहरांसाठी सेवा सुरू अाहे. यात नांदेड -मुंबई नांदेड -हैदराबादचा समावेश आहे. पुढील १५ दिवसांत नांदेड -दिल्ली अशी विमानसेवा सुरू होणार आहे. डिसेंबरअखेर जळगाव, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणांहून विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. 

 

दरम्यान, मुंबईत या संदर्भात झालेल्या बैठकीबाबत विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. सोलापूरची विमानसेवा नेमकी केव्हा सुरू होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिध्देश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा अडसर असल्याचे कारण देत अाता सोलापूर शहरास या योजनेतून केंद्राने वगळल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 


येत्या १८ ला सुनावणी 
चिमणीपाडकामास उच्च न्यायालयाकडून तूर्त स्थगिती असल्याने महापालिकेची पुढील कारवाई थांबली अाहे. १८ डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात साखर कारखाना कामगार संघटनेच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. 


अन् डेक्कनचा नकार 
डेक्कनचार्टरने चिमणीमुळे सोलापूर विमानतळाचा दुसरा एअर वे बंद होत असल्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणला कळवले होते. अशा परिस्थितीत विमानसेवा सुरू करता येणार नाही. विमानसेवेसाठी विमानतळाला दोन एअर वे असणे गरजेचे असते. जर एका एअरवेच्या दिशेने वाऱ्याचा वेग अधिक असेल किंवा अडचण निर्माण झाली तर आपत्कालीन परिस्थितीत दुसरा एअर वे महत्त्वाचा ठरतो. दुसऱ्या बाजूला असलेल्या चिमणीमुळे दुसरा मार्ग पूर्णत: बंद झाला. 

बातम्या आणखी आहेत...