आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवार यांच्या बोलण्यात आला गोडवा, "कार्य'शैलीत तोच ठसका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- वादग्रस्तविधानांमुळे गेल्या दोन वर्षात बॅकफूटवर गेलेले राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या जाहीर कार्यक्रमांमधील संभाषण शैलीत बदल केल्याचे सोलापूर दौऱ्यात दिसून आले. संभाषण शैलीत बदल केला असला तरी संघटनात्मक कार्यशैलीतला ठसका आहे तसाच आहे. "चमकोगिरी' करणारांसाठी त्यांचे दरवाजे बंदच आहेत, हे दौऱ्यातील काही घटनांमधून दिसले.

राष्ट्रवादीने दीड महिन्यापूर्वी अजित पवार यांची सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर पवारांच्या उपस्थितीत रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांत खासदार विजयसिंह मोहिते यांच्यासह अनेक ज्येष्ठ सहकाऱ्यांना पुन्हा पाठबळ द्यायला सुरुवात केली आहे. पण दुसरीकडे राष्ट्रवादीचा बहुतांश कारभार हा अजित पवार यांच्या सल्ल्यानेच हाेतोय. प्रदेशाध्यक्षपद, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद, जिल्हावार अध्यक्षांच्या निवडी यासह विविध सेल प्रमुखांच्या निवडी अजित पवार यांच्या सूचनेनुसारच झाल्या आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून अजित पवार यांची झालेली निवड झालेल्या अजितदादांच्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे की नवी राजकीय मांडणी करण्याचा डाव आहे याबद्दल पक्षातील अनेकांच्या मनात अजूनही शंकाच आहेत. पण अजित पवार यांच्या स्वभावात झालेला बदल अनेक गोष्टी उलगडण्यास पूरक आहेत.
अाजवर जिल्ह्यातील गटबाजीला पाठबळदेणाऱ्या अजित पवार यांनीच रविवारी कार्यकर्त्यांना गटबाजी टाळण्याचे आवाहन केले. मी तर ताक फुंकून पितोय, तुम्हीही शब्द जपून वापरा हा त्यांचा "खास' संदेश होता. एकीकडे ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते यांचे अनेकदा कौतुक केले. त्याचवेळी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांवर शेलक्या शब्दात टीका करणेही टाळले. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी जवळपास मिनिटे कार्यकर्त्यांना वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन असा सामाजिक वसा सांगणारा कृतिशील कार्यक्रम सांगितला. यासाठी बारामती, अकलूजमध्ये केलेल्या कामाची माहिती दिली.
मेळाव्यापूर्वी सकाळी पूर्व भागातील एक ज्येष्ठ कार्यकर्ते पवारांना आमच्या घरी जेवायला या, असा अाग्रह करीत होते. त्यावर अजितदादांनी, "अरे बाबा मी तुझाच आहे, मी जरा नव्या माणसांच्या घरी जातो,' असे सांगितले. "बुके घेऊन कशाला येता, अशा गोष्टीत पैसे कशाला खर्च करता,' अशी सूचनाही ते अनेक कार्यकर्त्यांना करीत होते. विधान परिषद निवडणुकीत दीपक साळुंखेंना दगाफटका झाला तर "बघून घेईन' असे शब्द अजितदादांच्या तोंडून एेकणारे कार्यकर्ते त्यांच्या या कार्यशैलीमुळे अचंबित होताना दिसत होते.

बेरीज जमत नसेल तर वजाबाकी करू नका
विधान परिषदेच्या निवडणुकीत दीपक साळुंखे यांच्या पराभवाला आमचेच काही सहकारी जबाबदार आहेत. त्याची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे, एवढे बोलूनच अजितदादांनी त्यावर जास्त भाष्य केले नाही. माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यासारख्या नेत्यालाही, दुसऱ्याची "स्टेपनी' होऊ नका, असा सल्ला दिला. तुम्हाला बेरीज जमत नसेल तर किमान वजाबाकी करू नका, हात जोडून सांगतो माझ्या पाया पडू नका, गाडीचा, आॅफीसचा दरवाजा उघडण्यासाठी पुढे पुढे करू नका,' असा सल्लाही दिला.

परिस्थितीने बदल
राष्ट्रवादीसाठीसध्याविपरीत परिस्थिती आहे. खुद्द अजित पवारच चौकशीच्या फेऱ्यात आहेत. अशा परिस्थितीत त्यांना राष्ट्रवादीचे संघटन करावे लागत आहे. परिस्थिती माणसाच्या स्वभावात बदल घडवून आणते. मूळ स्वभाव बदलण्यात मर्यादा येतात, मात्र किमान स्वत:च्या वर्तणुकीत बदल करणे गरजेचे आहे. एकूणच विपरीत परिस्थिती पाहून अजितदादांनी स्वत:च्या शैलीत बदल केलेला दिसतो. प्रताप आसबे, ज्येष्ठराजकीय विश्लेषक.

कार्यकर्त्यांना प्रबोधनाचे धडे...
खासगीतभेटायला आलेल्या अनेकांना पाच मिनिटाच्यावर त्यांनी थांबू दिले नाही. काम झाले असेल तर इथे थांबू नका, माझ्या मागे वाहनांचा ताफा घेऊन वरातीसारखे फिरू नका. निवेदने, पत्रे देऊन राष्ट्रवादीत पद मागू नका. संघटनेचे काम प्रत्यक्ष केल्याचे दाखवा मगच पद मागा, हा नेहमीचा सल्लाही ते द्यायला विसरले नाहीत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ जिल्ह्यातले विद्यमान अामदार रमेश कदम यांच्यावरील पोलिसी कारवाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची जनमानसात पक्षाची चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी त्यांचे हे प्रबोधनाचे धडेच असल्याचे जाणवत होते.
बातम्या आणखी आहेत...