आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीवर आता बँकेचा अभ्यास सुरू, सरकारकडून आश्वासनावर आश्वासन; 'सरकारचं भिजत घोंगडे'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरकारचे एकामागून एक बदलत जाणारे निर्णय आणि त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांची झालेली संभ्रमावस्था, यामुळे शेतकऱ्यांना ऐन खरिपाच्या पेरणीदरम्यान ना दहा हजार रुपयांचे कर्ज मिळाने ना कर्जमाफीचा लाभ. शासनाने कर्जमाफीच्या निर्णयामध्ये फेरबदल केल्यामुळे तसेच बँक स्तरावरून कुठलीही माहिती जमा करता घोषणा केल्यामुळे कर्जमाफीची आकडेवारी अजूनही समोर आलेली नाही. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनीही मौन बाळगले आहे. मात्र, शेतकऱ्यांना एकाही घोषणेचा लाभ मिळाला नाही. 
 
उस्मानाबाद - राज्यभरात शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारने काही निकषाच्या आधीन राहून शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलनही बऱ्याच अंशी शमले. परंतु, आता सरकारने निकषाच्या आडून विविध नियम अटी लादण्यास प्रारंभ केल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा संतापाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. एकीकडे शेतकऱ्यांना पेरणीसाठी तातडीने १० हजार रुपयांची मदत करण्यात येईल, याबाबत बँकांना आदेश दिल्याचे सरकार म्हणत असले तरी या घोषणेच्या १५ दिवसानंतरही बँकाकडून शेतकऱ्यांना १० हजाराच्या आगाऊ रकमेबाबत नकारघंटाच मिळत असल्याने कर्जमाफीबरोबरच १० हजाराच्या मदतीचे भिजत घोंगडं कायम असल्याचे दिसत आहे.दरम्यान, कर्जमाफीवर शासनाचा अभ्यास सुरू असल्याचे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांची री ओढत आता बँकेच्या अधिकाऱ्यांनी याद्या बनविण्याचेच काम सुरू असून, कोणाकोणाला कर्जमाफी मिळाली, हे आताच सांगता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. 
 
शासनाने कर्जमाफी बरोबर खरीप हंगामातील पेरणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपयाची उचल देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शुक्रवारी (दि.१४) दिल्याचे जाहीर करण्यात आले. याच दिवशी खुद्द सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व जिल्ह्यातील महसूल सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. ही माहिती महसूल सहकार विभागाने सर्व बँकापर्यंतही पोहोचवली. त्यामुळे किमान सोमवारी या १० हजार रुपयांच्या उचल रकमेचे वाटप सुरू होईल असे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात जिल्हाभरात एकाही बँकेने अशा पद्धतीने उचल देण्यासंदर्भात आमच्याकडे वरिष्ठांचे कोणतेही आदेश नसल्याचे सांगून ही रक्कम देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकरी अद्याप या १० हजार रुपयांच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. दररोज जिल्ह्यात हजारो शेतकरी उचल मिळणार या अपेक्षेने बँकेत दाखल होत आहेत. परंतु, त्यांना या तातडीच्या कर्जाबाबत आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे आदेश प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे वाटप करण्यात येत नसल्याचे प्रत्येक ठिकाणी सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होत आहे. 
 
याद्या बनविण्याचे काम सुरू 
- तालुक्यातील शेतकऱ्यांना१० हजार रुपये देण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून अद्याप कसलेही आदेश नाहीत तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनाचे आदेश सारखे बदलत असल्यामुळे निर्णय घेण्यासाठी अडचणी येत आहेत.
-ए.व्ही. बारसकर, ज्येष्ठ तपासणीस जिल्हा बँक परंडा. 
 
ना अर्ज.. ना मदत, दररोज शेतकऱ्यांचा रतीब 
परंडा - अद्याप शेतकऱ्यांना १० हजाराची उचल मिळाली नाही, तसेच कर्जमाफीचा अर्ज भरण्याचीही प्रक्रिया तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक राष्ट्रीयीकृत बँकेत सुरुवात झाली नसून याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून कसलेही आदेश मिळाले नसल्याचे जिल्हा बँकेचे अधिकारी यांनी सांगितले. तर स्टेट बँक अॉफ इंडिया,बँक अॉफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेचे अधिकारी यांनी थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या आठवडा भरात लावल्या जातील असे सांगितले. यामुळे सरकारने केलेली घोषणा फसवी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

याबाबत माहिती घेत आहोत 
येणेगूर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतही दररोज शेतकरी १० हजार रुपयांच्या मदतीच्या आशेने हेलपाटे मारत आहेत. त्या अनुशंगाने चाैकशी केल्यानंतर या संदर्भात वरिष्ठांकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत. तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती घेत असून सध्यातरी वाटप सुरू नसल्याचे व्यवस्थापक रवींद्र तेजावत यांनी सांगितले. 

आदेशच आलेले नाहीत 
वालवड येथे कर्जाच्या १० हजार रुपयांच्या वाटपासंदर्भात कोणताच आदेश नसल्याचे कर्जमाफी मिळवण्याच्या फॉर्मचीही माहिती नसल्याची बाब समोर आली.वालवड येथील आर्थिक व्यवहारासाठी जिल्हा बँकेचा आधार आहे. त्यामुळे याचा किती फायदा शेतकऱ्यांना होणार याबाबत साशंकता आहे. त्यातच शासनाचा कोणताही आदेश नसल्याचे बँकेकडून सांगण्यात येते. तर कर्जमाफी मिळवण्याच्या फॉर्मबाबत कोणतीच माहिती नसल्याचेही बँकेचे व्यवस्थापक डी. डी. गरड यांनी सांगितले. 

येडशीतही ठणठणाट 
येडशीत स्टेट बँक बँक ऑफ महाराष्ट्र या दोन राष्ट्रीयीकृत बँका असून या दोन्ही बँकानी अद्याप कुठले ही कर्ज माफी अर्ज भरून घेतले नाहीत. ना कर्ज माफी केली तसेच एका ही शेतकऱ्यास आज पार्यंत १० हाजार रुपये नवीन घोषणेचे पीक कर्जाचे वाटप केले गेले नाही. 
बातम्या आणखी आहेत...