Home »Maharashtra »Western Maharashtra »Solapur» News About Chhatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास रोज अभिषेक करतो मावळा

महेशभंडारकवठेकर | Mar 20, 2017, 11:00 AM IST

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास रोज अभिषेक करतो मावळा
पंढरपूर: पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास दररोज अभिषेक दैनंदिन नित्यपूजा येथील एक तरुण गेल्या तीन ते चार वर्षांपासून अखंडपणे करत आहे. प्रतापसिंह कमलाकर साळुंखे असे त्या तरुणाचे नाव अाहे. त्याच्या या उपक्रमाचे संपूर्ण शहरात कौतुक होत आहे.

शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि बेलीच्या महादेवाजवळील संभाजी महाराजांच्या पुतळा परिसरात तुम्ही सकाळी फेरी मारल्यास तुम्हाला २३ ते २५ वयाचा तरुण नित्याभिषेक करताना दिसेल. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हे नित्याचे दृष्य आहे. प्रतापसिंह साळुुंखे याला हा छंद लागला आहे. सूर्य उगवायच्या आत थोरल्या तालमीच्या मैदानावर थोडी मेहनत करून तो घरी परततो. अंघोळ उरकून हंडाभर पाणी पूजेचे साहित्य घेऊन स्वारी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या पूजनासाठी रवाना होते. पुतळा परिसराची साफसफाई करतो. पुतळ्याला जलाभिषेक, नित्यपूजा करतो. त्या नंतर शिवाजी महाराजांची आरती आणि प्रेरणामंत्राचे पठण होते.

शिवाजी पुतळ्याची नित्यपूजा झाल्यानंतर बेलीच्या महादेवाजवळील संभाजी महाराजांच्या पुतळ्याकडे स्वारी निघते. संभाजी महाराजांच्या पुतळ्यालाही जलाभिषेक, सालंकृत पूजा करून पुतळ्यासमोर संभाजी हृद्यस्त्रोतांचे पठण, ध्येयमंत्र आणि प्रेरणा मंत्र होतो. हा संपूर्ण दिनक्रम दररोज पूर्ण करताना केवळ छत्रपतींचे आम्ही सेवक या भावनेतून नि:स्वार्थीपणे केलेली ही आपली नित्यसेवा. दिनचर्येतील सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणून आपण याकडे बघतो.
बोलण्यापेक्षा स्वत:पासून सुरुवात करतो, असे प्रामाणिक मत प्रतापसिंह व्यक्त करतो.

शिवप्रतिष्ठान प्रतिहिंदुस्थानचा विभाग प्रमुख म्हणून प्रतापसिंह कार्यरत अाहे. देव, देश आणि धर्मासाठी आपण कटिबद्ध असल्याची भावना तो बाळगतो आणि परमपूज्य भिडे गुरुजींच्या शब्दाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो, असेही मोठ्या अभिमानाने तो सांगतो. शिवप्रतिष्ठानचे काम करीत असतानाच तो संसारातील सर्व जबाबदाऱ्या मोठ्या खुबीने पार पडतो. शेतीची कामे आणि तहसील कचेरीमध्ये स्टॅम्पव्हेंडरचे तो काम करतो.

प्रतापसिंहाचे इतर उपक्रम
या शिवाय छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त सध्या एक महिनाभर प्रतापसिंह दररोज सायंकाळी सात वाजता संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त महाराजांच्या बलिदानाची स्मृती जतन करत असताना एकत्र धारकऱ्यांसमवेत श्लोक तसेच प्रेरणामंत्राचे सामुदायिक पठण करतो. याबरोबरच नवरात्रामध्ये दररोज पहाटे शहरातून दुर्गा माता दौड, धारातीर्थी दुर्ग मोहीम, रायगडावरील शिव पुण्यतिथी सोहळ्यामध्ये तो सक्रिय असतो.
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended