आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवहनच्या बसमध्ये आयटीएस प्रणाली सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका परिवहन विभागात केंद्राच्या जेएनयूआरएम योजनेतून आणण्यात आलेल्या बसमधील बंद ठेवण्यात येणारी आयटीएस प्रणाली यापुढे चालू ठेवण्यात येणार आहे. परिवहन समितीने परिपत्रक काढून प्रणाली सुरू ठेवण्याचे आदेश चालकांना दिले आहेत.
मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी आयटीएस प्रणाली सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. परिवहन उपक्रमात १० व्हाॅल्वो बससह १५० बस आल्या असून, त्यात आयटीएस प्रणाली आहे. त्यात सीसीटीव्ही, वायफाय, स्पीकरसंच, स्क्रीन फलक, अलर्ट सिस्टीम, अपंगांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. आधुनिक सेवा सुविधा असतानाही ती बंद ठेवण्यात येत होते. त्यामुळे होणारे तोटे परिवहन विभागाच्या लक्षात आले. त्यानुसार ही प्रणाली सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार ९० टक्के बसमध्ये आयटीएस प्रणाली सुरू ठेवली जाणार आहे.
टेंडरच्या देखभालीसाठी टेंडर
बसमधीलआयटीएस प्रणाली देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेने टेंडर काढले असून, त्यातील मक्तेदारांशी आयुक्त काळम-पाटील चर्चा करून दर निश्चित करणार आहेत.

विमा नसल्याचा फटका
मागील आठवड्यात दोन बसमध्ये आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. विमा फंडमध्ये रक्कम नसल्याने नुकसानाचा भार परिवहनवर येणार आहे. परिवहनच्या अनेक सिटीबसमध्ये आयटीएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

गुरुवारी विशेष सभा
परिवहन समितीची विशेष सभा गुरुवारी घेण्यात येणार आहे. त्यात बस जळीत प्रकरणावर चर्चा होणार आहे. शिवाय जेएनयूआरएम योजना अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या बसची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्याची शक्यता आहे. तसेच पुढील बस खरेदीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

बसला सुरक्षा पुरवा : संभाजी आरमारची मागणी
परिवहन खात्याच्या वतीने बसला विमा नसल्याने नागरिकांची सुरक्षितता धाेक्यात आली आहे. परिवहनच्या विमा फंडात पैसे नाहीत तर लोकांच्या जीवाची काय हमी. विमा फंड ठेवा, बसच्या पुरवठ्याची चौकशी करा, अशी मागणी संभाजी आरमारने मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडे केली. यावेळी आरमारचे श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमाेडे, संजय सरवदे आदी उपस्थित होते.