आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादेत आज ५१ जोडपी बांधणार लगीनगाठ, शिवसेनेच्या वतीने विवाह सोहळ्याचे आयोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- शिवसेना प्रमुखबाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेंतर्गत शहरात बुधवारी (दि.२७) सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यासाठी सुमारे ५१ जोडप्यांची नोंदणी झाली असून वधु-वरांना शुभेच्छा देण्यासाठी युवासेनाप्रमुख अादित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री उपस्थित राहणार आहेत.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह रखडू नयेत, यासाठी शिवसेनेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना सुरू केली आहे. सोहळ्यास येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील हजार शिवसैनिक कामाला लागले आहेत. पोलिस मुख्यालयावर यासाठी भव्य लग्न मंडप उभारण्यात आला आहे. स्वयंपाकासाठी शेड तसेच सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांसाठी स्वतंत्र मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्यास २५ हजार वऱ्हाडी मंडळी उपस्थित राहतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. वऱ्हाडी मंडळीसाठी ५० हजार चौरस फुटाचा भव्य मंडप उभारण्यात आला असून वऱ्हाडी मंडळींसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. नवदांपत्यास आशीर्वाद देण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह मराठवाड्यातील शिवसेनेचे सर्व जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार, संपर्कप्रमुख, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोजन समिती, सोहळा नियोजन समिती, अक्षता वाटप समिती, रुखवत वाटप समिती आदी समित्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. वधु-वरांसाठी देण्यात येणारे साहित्य आठ दिवसांपूर्वीच देण्यात आले आहे. नवरदेवासाठी सफारी- सुट, फेटा, बाशिंग, मंडोळे, बुट तसेच वधूसाठी हळदीचा शालू लग्नासाठी पैठणी, मनी-मंगळसूत्र, जोडवे, चप्पल, पैंजण, ओढणी, मंडोळे आदी साहित्य त्यांना वितरीत करण्यात आले आहे. बुधवारी (दि.२७) रोजी आयोजित विवाह सोहळ्यास वधु-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी केले आहे.