आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चाला येऊ पण, गाड्या अन् तेल-पाण्याच्या नियोजनाचे बघा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - नागपूरच्या मोर्चाला आम्ही निश्चित येऊ, सांगाल तेवढ्या गाड्या काढू, पण डिझेल टाकून गाड्याची सोय करा, कारखानदार किंवा इतरांना सांगून तेवढं अडजेस्ट करा, अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थेट निरीक्षकांच्या समोर केली. 

 

जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक शनिवारी प्रदेश निरीक्षक रोहित टिळक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्ष इंदुमती पाटील, प्रदेश सरचिटणीस सुनेत्रा पवार, अलका राठोड, करमाळा नगराध्यक्ष वैभवराजे जगताप आदी उपस्थित होते. सुरवातीला जिल्हाध्यक्ष पाटील यांनी, येत्या १२ डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशनवर काँग्रेसच्या वतीने मोठा राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात येणार असून त्यात सोलापूर शहर जिल्ह्यातून ५०० पेक्षा जास्त गाड्यामध्ये कार्यकर्ते सहभागी व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. मोर्चात प्रत्येक तालुक्यातून कोणते पदाधिकारी किती गाड्या कार्यकर्ते आणणार हे सांगावे असे आवाहन त्यांनी केले. 

 

माजी सभापती चंद्रकांत सुर्वे म्हणाले, ‘आम्हाला मोर्चात यायचं आहे, त्या निमित्ताने कार्यकर्त्यांना नागपूर पाहता येईल. आम्ही आमचा जेवणाचा डबा घेऊ, तुम्ही सांगाल तेवढ्या गाड्या काढू पण, त्या गाड्या त्यास डिझेलचं तेवढं तुम्हीच पाहा. कारखानदारास सांगा किंवा इतरांना सांगा पण तेल टाकून गाड्याचं पाहा.’ ‘सांगोलाचे अध्यक्ष राजकुमार पाटील म्हणाले, आमचा तालुका दुष्काळी आहे, इकडं आमदार पण आपला नाही, त्यामुळे माणसं आणू पण तेल घालून गाड्याची सोय करा.’ उत्तर सोलापूरचे अध्यक्ष लक्ष्मण भोसले म्हणाले, की मोर्चात निश्चित कार्यकर्ते येतील, आमच्या तालुक्यास द्याल त्या उद्दिष्टानुसार गाड्या काढू, त्या गाड्या त्यात डिझेलची सोय झाली पाहिजे अशी अपेक्षा मांडली. 

 

जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब पवार म्हणाले मी मोर्चासाठी स्वतः गाड्या माझ्याकडून पाठवितो, आणखी सांगाल त्याची तयारी आहे, असेही त्यांनी सांगताच नेतेमंडळीनी टाळ्याचा कडकडाट करीत पवार यांचा आदर्श सर्वानी घ्यावा असे आवाहन केले. सुनेत्रा पवार यांनी शेतीपंप वीजबिल वसुली जाचक असून त्याविरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केले. 
निरीक्षक रोहित टिळक म्हणाले, देशातील राज्यातील वातावरण बदलत आहे, जनतेची सरकारच्या विरोधात नाराजी असून मोर्चाद्वारे सरकारला आपली ताकद दाखवायची आहे. प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं गाड्याकरून कार्यकर्ते येणार आहेत. कोण किती गाड्या आणणार, त्या गाडीत कोण प्रमुख असणार त्याचे नाव, मोबाइल नंबर द्या, त्यावर संपर्क होणार असून कोणत्या जिल्ह्यातून किती गाड्या कार्यकर्ते आले याचे लक्ष ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे सांगाल तसं करा, असे आवाहन त्यांनी केले. सातलिंग शटगार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. 

 

 
दिलीप मानेंच्या अभिनंदनाचा ठराव 
माजी आमदार दिलीप माने यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली, पुढे काय होईल याचा विचार करता मानेंनी ती स्विकारली. त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. तसेच तीन महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेत माजी आमदार दिलीप माने याचे नाव गोवण्यात आले, त्यांनी उमेदवारी दाखल केली राज्यस्तरावर त्यांची ओळख निर्माण होत असल्याने काही स्थानिक असंतुष्टांनी जाणीवपूर्वक तो प्रकार केल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष पाटील यांनी केला त्या घटनेचा निषेध ठराव मांडला. 

 

निषेध केला पण, मनसेचे नाव टाळले 
मंुबई पक्ष कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला असून त्या घटनेचा निषेध ठराव शटगार यांनी मांडला. त्यास माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब काळे यांनी अनुमोदन दिले. काल शुक्रवारी शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले यांनी, मंुबई पक्ष कार्यालयावर ‘मनसे'ने हल्ला केल्याचे सांगत निषेध केला. पण, आज जिल्हा काँग्रेसने मनसेचे नाव टाळत अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला असे सांगत निषेध ठराव मांडला. 

बातम्या आणखी आहेत...