उस्मानाबाद - सुमारे महिनाभराच्या विश्रांतीनंतर रविवारी (दि. १६) जिल्ह्यात सर्वत्र पावसाची बरसात झाली. पेरणीनंतर पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या कोमेजून गेलेल्या पिकांना नभातून बरसलेल्या या जलधारांनी नवसंजीवनी दिली.
पेरणीनंतर गायब झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट घोंघावत होते. या पावसामुळे जिल्ह्यातील चिंतातूर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले असून संकट सध्यातरी टळले आहे. दरम्यान, अपेक्षित उत्पन्नासाठी बळीराजाकडून आणखी जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मागील आठ वर्षांचा विचार केल्यास यावर्षीच पावसाने जिल्ह्यात वेळेवर चांगली सुरुवात केली होती. जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात सुमारे ८० टक्के पेरण्या उरकल्या होत्या. जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. उशिरा पावसामुळे मागील सात-आठ वर्षांत मुग, उडीदापासून दूर गेलेला शेतकरी यंदा पुन्हा या पिकांकडे वळला. मात्र, जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पावसाने चांगलीच ओढ दिली. जुलैचे पहिले दोन आठवडेही कोरडे गेले. यामुळे प्रशासन, शेतकरी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर रविवारी (दि.१६) पाऊस बरसला. उस्मानाबादेत दुपारी दीडच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. विश्रांती घेत सायंकाळी साडेसहापर्यंत पाऊस बरसत होता. शहरातील आठवडी बाजारातील व्यापारी ग्राहकांची त्रेधा उडाली. परगावाहून आलेल्या बाजारातील ग्राहकांना अासऱ्यासाठी धावाधाव करावी लागली. उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी, ढोकी, तेर, कोंड, पाडोळी, अंबेजवळगा, गावसूद, खानापूर, केशेगाव परिसरातही कमी अधिक पाऊस पडला आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. पावसासाठी आसुसलेल्या पिकांवर या पावसामुळे तेज आले आहे. मात्र, पिकांच्या अपेक्षित उत्पादन वाढीसाठी आणखी पावसाची गरज आहे.
भूमतालुक्यात शेतकरी सुखावले : अचानक गायब झालेल्या पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी सुुखावला आहे. भूम तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ३८ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. पणाळवाडी, मात्रेवाडी, पाथरुड, ईराची वाडी परिसरातील भागात ८० ते ९० टक्के पेरणी झाली. मात्र, पिके धोक्यात येणाची चिंता सतावत होती. रविवारी सायंकाळपर्यंत पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे पिकांना चांगला आधार मिळाला आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
{परंडा तालुका शहर परिसरात दुपारी च्या दरम्यान पावसाच्या मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. पावसाच्या मध्यम सरी कोसळल्यामुळे परिसरातील पिकांना जीवदान मिळाले. व्यापाऱ्यानी वाजताच बाजार गुंडाळावा लागला.
{लोहारा तालुक्यात रविवारी १० मिनिटेच पाऊस पडला. दुबार पेरणी टाळण्यासाठी आणखी दमदार पावसाची आवश्यकता आहे.
{उमरगा तालुक्यातील काही गावांमध्ये १० ते १५ मिनिटे पाऊस बरसला. तुळजापूर येथे वादळी वाऱ्यासह अर्धातास पाऊस बरसला. महिनाभरानंतर बरसलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.
कळंब तालुक्यातील ७२ हजार हेक्टरवर पिके वाळू लागली होती. रविवारी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले. दुपारी चारपासून तालुक्यातील विविध भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, ४५६०० हेक्टरवरील सोयाबीनला आधार मिळाला आहे.