आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 पेक्षा जास्त कामगार नकोत म्हणून कपात, नवरात्र उत्‍सवादरम्‍यानच कामगारांवर संक्रांत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भविष्य निर्वाह निधीसंदर्भात तपासणी सुरू झाल्याने यंत्रमाग कारखानदारांनी २० पेक्षा अधिक कामगार कमी करण्याचे सुरू केले. एकाच छपराखालील इतर युनिट्सना चक्क टाळे लावत असल्याचेही चित्र आहे. गेल्या महिन्यात गणेशोत्सवाच्या तोंडावर कारखानदारांनी बंद पाळला होता. आता नवरात्र काही दिवसांवर येऊन ठेपला आणि कामगारांवर पुन्हा ‘संक्रांत’ आली. 
 
भविष्य निधी कार्यालयाच्या पथकांनी प्रत्येक अाठवड्यात २० कारखान्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट घेतले. त्यानुसार दररोज एका कारखान्यात त्यांची तपासणी असते. ही पथके येण्यापूर्वीच काळजी म्हणून काही कारखानदारांनी कामगार कपातीचे धाेरण स्वीकारले आहे. काही युनिट्स बंद राहिले तरी हरकत नाही. पण ‘इपीएफ’ची झंजट नको, अशी त्यांची मानसिकता दिसून येते. त्यामुळे कामगारांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
कामगार हतबल : भविष्य निधी, किमान वेतन या विषयांवर प्रत्यक्ष काम करणारे कामगार दूरच असतात. कारण त्यांना काम हवे असते. अधिक काही मागितले, संघर्ष पेटला तर रोजी-रोटी बुडेल याची भीती असते. त्यांची सध्याची स्थिती तशीच आहे. एकीकडे हक्कासाठी लढाई अन् दुसरीकडे कारखानदारांची दांडगाई...यामुळे दाद मागायची कुठे? असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. साहजिकच तो हतबल अाहे. शुक्रवारी काही कामगार ‘दिव्य मराठी’शी बोलताना ही हतबलता व्यक्त केली. आमचे कुठेही नाव नको, असेही बोलून गेले. 
 
कामगार कपात करून ‘पीएफ’चा प्रश्न सुटणारा नाही. उलट त्याने दोघांचे नुकसानच होईल. याबाबत संबंधित कारखानदारांची बैठक बोलावतो. समस्या ऐकून तोडगा काढण्याचे प्रयत्न राहतील. 
- पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष, यंत्रमागधारक संघ 
 
बातम्या आणखी आहेत...