आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासाठी २२३ हेक्टरवर ताबा; ४५२ कोटींचा मावेजा वाटप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी एकूण २५५.५९ हेक्टरपैकी २२३.२४ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले असून ४५२.४४ कोटी रुपयांचा मावेजा वाटप करण्यात आला आहे.काही ठिकाणी स्थानिकांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी १७ जुलैची डेडलाइन देऊन शंभर टक्के जमिनीचा ताबा महामार्गप्रकल्पाकडे देण्याचे आदेश दिल्याने प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. 
 
उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या सोलापूर-संगारेड्डी धुळे - सोलापूर या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. यामध्ये उस्मानाबाद येथील विशेष प्रकल्पांतर्गत ८५ किलाेमीटरचे भूसंपादनाचे काम पूर्ण होत आहे. यासाठी सुरवातीपासूनच भूसंपादनाची प्रक्रिया वादग्रस्त ठरली. त्यातच अवार्ड मंजूर झाल्यानंतर मावेजा वाटपाची प्रक्रिया तर तेथील कर्मचाऱ्यांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे चांगलीच वादग्रस्त ठरली. सध्या या कार्यालयातील वादग्रस्त कर्मचाऱ्यांना काढल्याची माहिती आहे. महामार्गाचे रुंदीकरणासाठीच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात असून मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथील आढावा बैठकीनंतर या कामाला आणखी गती देण्यात आली आहे. त्यानुसार मागील दोन दिवसांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस संरक्षणात संपादनाला विरोध करून मालमत्ता रिकाम्या करण्यास अडथळा करणाऱ्यांच्या घरावर जेसीबी, पोकलेन चालवून रुंदीकरणाच्या कामासाठी महामार्ग मोकळा केला. तसेच आतापर्यंत जवळपास ८० टक्के जमिनीचे संपादन करून ती रुंदीकरणाच्या कामासाठी महामार्ग प्रकल्पाकडे सोपवली असून उर्वरीत जमिनीचा ताबा घेण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील धुळे-सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणातील रस्त्याचे काम जवळपास पूर्ण होत आले असून सध्या काही मोठ्या शहराजवळील रस्ते, पूल आदी कामे बाकी असल्याचे दिसून येते. 

२२३.२४हेक्टरच्या संपादनापोटी ४५२.४४ कोटीचे वाटप : जिल्ह्यातूनजाणाऱ्या ८५ किलोमीटरच्या महामार्गासाठी एकूण २५ गावांमधील २५५.५९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. संपादित जमिनीपोटी मावेजासाठी शासनाकडून ५४३.७३ कोटी रुपये मिळणे प्रस्तावित असून त्यापैकी ५२६.१७ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यापैकी ४५२.४४ कोटी रुपये वाटप केले आहेत. अद्याप ३२.३५ हेक्टर क्षेत्राचा ताबा महामार्ग विभागाकडे सोपविणे बाकी आहे. सध्या महत्त्वाच्या उस्मानाबाद येथील उड्डाणपुलाचे काम प्रलंबित असून, तेही येत्या वर्षभरात पूर्ण होऊन हा राष्ट्रीय महामार्ग खऱ्या अर्थाने वाहनधारकांसाठी वापराकरिता परिपूर्ण होणार आहे. 

सदरील कार्यालयांतर्गत मागील कालावधीत तत्कालीन अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिळून मृतांच्या नावावरील मावेजा उचलणे, सामाईक हिश्यातील जमिनीचा एकट्यालाच मावेजा देणे, शहानिशा करता अतिरिक्त मावेजा देणे अशा एक ना अनेक भानगडी करून ठेवल्या. यातील एका प्रकरणात तर पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला. परंतु, याप्रकरणातील संबधित अधिकारी, कर्मचारी येथून सटकले असून याप्रकरणाचे पुढे काय झाले हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे या प्रकरणाचीही चर्चा होत असून, याची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाईची गरज व्यक्त होत आहे. 

वादग्रस्त प्रकरणे गुलदस्त्यातच! 
महामार्गासाठी जमीन संपादनाची कारवाई सुरू झाल्यानंतर सुरवातीला संपादीत जमिनीचे तेथील बाजारभावानुसार अवार्ड घोषित केले. त्यानुसार अनेकांना मावेजा वाटप झाला. परंतु, नंतर शासनाकडून आलेल्या नवीन आदेशानुसार एकूण संपादीत जमिनीच्या क्षेत्रानुसार अवार्ड रिवाईज करण्यात आले. यामुळे पूर्वी वाटप झालेल्या कांही शेतकऱ्यांकडे आगाऊ रक्कम फिरणार असल्याचे दिसत असून त्यांच्याकडील रक्कम परत वसूल करण्याचे जिकरीचे काम पुन्हा भुसंपादन विभागाला करावे लागणार आहे. त्यातच यामध्ये कांही बड्या लोकांचा समावेश असल्याने अवार्ड लवकर घोषीत होऊ नये यासाठीही विविध माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे कळते. 

रिवाईज अवार्डमध्ये निघणार रिकव्हरी 
उस्मानाबाद ते सोलापूरपर्यंतचे चौपदरीकरण पूर्णत्वास आले आहे. तामलवाडीजवळ जमीन संपादनाची कारवाई करण्यात आली. 
 
बातम्या आणखी आहेत...