सोलापूर- घरासमोर रांगोळी, अाकाश दिवे, विद्युत रोषणाई, घरात गोडधोड करण्यासाठी महिलांची तयारी. तरुणांची मंडप उभारण्याची लगबग, काॅलन्या, सोसायट्यांत रोषणाई, लाउड स्पिकरचा अावाज, भीमगीतांचा जल्लोष. हा अानंद, जल्लोष शिवाजी चौक, बुधवार पेठ, सम्राट चौकासह शहरातील अन्य भागात सुरू अाहे. गुरुवारी महामानव डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांचा १२५ वा जयंती उत्सव. या सोहळ्यामुळे नागरिकांत चैतन्य अानंदाची लहर अाहे. भीम जल्लोषाच्या स्वागताला जणू ही भीमनगरी रोषणाईच्या प्रकाशात उजळून निघाली अाहे.
जयंती मिरवणुकीसाठी वाहने तपासून घ्या : पोलिस प्रशासन
डॉ. आंबेडर जयंती मिरवणुकीत सामील होणाऱ्या वाहनांसाठी तपासणी आवश्यक अाहे. २१ ते २३ एप्रिल दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी या वेळेत होम मैदान येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विशेष कक्ष स्थापण्यात येणार आहे. इच्छूक मंडळांनी आवश्यक सर्व कागदपत्रे वाहनसहसोबत आणावीत, असे आवाहन उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी केले आहे. आरटीओचे प्रमाणपत्र नसलेले वाहन मिरवणुकीत सामील करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिस बंदोबस्ताचे नियोजन
डॉ. आंबेडकर पुतळा परिसर रमाबाई आंबेडकर नगर परिसरात बंदोबस्त नेमल्याची माहिती विशेष शाखेचे पोलिस अधिकारी सूर्यकांत पाटील यांनी दिली. पुतळा परिसरात दिवसभर गर्दी असल्याने तीन पोलिस निरीक्षकांसह ५० कर्मचारी, एसआरपीएफ, स्थानिक पोलिस असतील. आंबेडकर नगरात दोन पोलिस निरीक्षक कर्मचारी असा ३० जणांना नेमले आहे. शहरातही विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त असणार आहे.
सोमवारपासून समता पंधरवडा; जिल्हा परिषदेतर्फे कार्यक्रम
सोलापूर | डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्षा जयमाला गायकवाड यांच्या उपस्थित कार्यक्रम होईल. जयंतीनिमित्त सोमवारपासून जिल्ह्यात समता पंधरवडा साजरा होणार आहे.
समाज कल्याण समितीच्या सभापती कल्पना निकंबे यांनी माहिती दिली. मुख्य प्रवेशद्वारासमोर संविधान सरनामा कोनशिला उभारण्यात आली असून त्याचे लोकार्पण होणार आहे. १८ एप्रिल ११ तालुक्यांमध्ये जयंती कार्यक्रम. अकोलेखुर्द (ता. माढा) येथून पंधरवड्याची सुरुवात होईल. त्यानंतर कामतीखुर्द (ता. मोहोळ), श्रीपूर (ता. माळशिरस), अकोलेकाटी (ता. उत्तर सोलापूर), केम (ता. करमाळा), धायटी (ता. सांगोला), कराळे (ता. पंढरपूर), बक्षीहिप्परगा (ता. दक्षिण सोलापूर), किरनाळी (ता. अक्कलकोट), गुंजेगाव (ता. मंगळवेढा), पानगाव-शेळगाव (ता. बार्शी) या क्रमाने रोज कार्यक्रम होतील. दलित वस्त्यांमध्ये हायमास्ट दिवा बसवण्याचे भूमिपूजन करण्यात येईल.
मे महाराष्ट्र दिनी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात समता पंधरवडाचा समारोप होईल. या प्रसंगी आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात येईल, असे सभापती निकंबे यांनी सांगितले.