आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हद्दवाढ भागात दिवाळीपर्यंत ड्रेनेजलाइन जोडणी होणार, 30 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्यस्तर नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरात विशेषत: हद्दवाढ भागात ड्रेनेज लाइन आणि देगाव, प्रतापनगर, कुमठे येथे मलनिस्सारण केंद्र उभारण्यात येत आहे. ही सर्व कामे ३० सप्टेंबरच्या आत पूर्ण करा, असा आदेश महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी ड्रेनेज विभागास दिला. 
 
या योजनेअंतर्गत ३१२ कोटींची कामे होत आहेत. प्रतापनगर येथील मलनिस्सारण केंद्रातील पाणी सोडण्याबाबत अडचणी होत्या. सिंचन विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडवली. कुमठे येथील केंद्रात वीजजोडणीचा मुद्दा टेंडरमध्ये नव्हता. त्याबाबत कार्यवाही करून तेथील प्रश्न सोडवला. दोन ठिकाणची जोडणी रेल्वे विभागामुळे प्रलंबित आहेत. त्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांसोबत गुरुवारी चर्चा करून मार्ग काढला.

 
यावेळी मनपा आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे, सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे, रेल्वेचे अधिकारी गौतम कुमार, रवींद्र सिंगल, व्ही. व्ही. रामचंदर, एस. के. जैन आदी उपस्थित होते. 
 
हद्दवाढ भागात ६३ हजार घरांना होणार लाभ 
ड्रेनेजपाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यावर त्यास घरगुती ड्रेनेज लाइन जोडण्यात येणार आहे. सुमारे ६३ हजार घरांची ड्रेनेज जोड होणार आहे. ड्रेनेज लाइन जोडणीसाठी महापालिका आयुक्त सकारात्मक असून, मिळकतदारांना दिवाळीपूर्वी ड्रेनेज लाइन जोडण्याचा प्रयत्न असेल, असे आयुक्त म्हणाले. 
 
रेल्वे प्रश्नाबाबत बैठक 
ड्रेनेजलाइन जोडणीबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी मनपा आयुक्तांनी चर्चा केली. रेल्वे वसाहतीस पाणीपुरवठा कमी होतोय. त्यामुळे नवीन जोड मनपाने द्यावे. सात रस्ता परिसरात रेल्वे विभागाकडून वाॅल कंपाऊंड बांधण्यात येत आहे. त्याचे काम महापालिकेने बंद केले. त्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रेल्वे अधिकाऱ्यांनी केली. जागेचे मोजणी करण्याचे ठरले. रेल्वे जागेवर आरक्षण मनपाकडून घालण्यात आले असून, ते काढावे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...