आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापुरात निरक्षरांना मिळणार आता दैनंदिन व्यवहाराचे ज्ञान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र. - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र.
तुळजापूर - तुळजापुरात २३० अशिक्षित प्रौढ नागरिक आढळून आल्याने पालिकेच्या पुढाकारातून प्रौढशिक्षण वर्ग (रात्रशाळा) सुरू करण्यात येत आहे. सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून संपूर्णपणे मोफत पहिल्या प्रौढशिक्षण वर्गाचा शुभारंभ गुरुवारी (दि.२३) होत आहे. 
१४ वर्षे वयापेक्षा अधिक वयाचे अशिक्षित अर्धशिक्षित महिला-पुरुषांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागात टप्प्या-टप्प्याने हे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी शहरात महिला बचत गटाच्या साहय्याने निरक्षरांची नोंदणी सुरू असून पहिला प्रौढशिक्षण वर्ग गुरुवारी येथील मातंगनगर भागातील व्यायामशाळेत सुरू करण्यात येत आहे. टाटा विज्ञान संस्थेतील ग्रामीण विकास पदवीच्या विद्यार्थिनी ग्लाडिस बायटे, शुभा चाकमा यांनी शहरातील अधिकृत दोन अनधिकृत झोपडपट्टी भागात सर्व्हे केला. अर्धशिक्षित आणि अशिक्षित नागरिकांचे प्रमाण आढळून आले. यातूनच प्रौढ वर्गाची संकल्पना पुढे आली. रोटरीसह संस्थांच्या सहकार्यातून हा सहा महिन्यांचा वर्ग असणार आहे. रोटरीतर्फे शिक्षक, शैक्षणिक साहित्य, किट, टॅब्लेट, संगणक आदी साहित्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. 
 
नागरिकांना आवाहन 
येणाऱ्या या उपक्रमासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. या वर्गासाठी पात्र नागरिकांनी स्वत: समोर येऊन आठवड्यातून तीन दिवस चालणाऱ्या सायंकाळी दोन तास घेण्यात येणाऱ्या प्रौढ प्रशिक्षण वर्गासाठी नोंदणी करून घ्यावी. तसेच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या पात्र नागरिकांची या वर्गात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन पालिका, नगराध्यक्ष मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. 
 
आठवड्यातील तीन दिवस सायंकाळचा वर्ग 
प्रौढ शिक्षण वर्ग सोमवार, बुधवार, शुक्रवार या आठवड्यातील तीन दिवशी सायंकाळी ते वाजेपर्यंत चालतील. यासाठी किमान लिहिता-वाचता येण्याइतके आणि दैनंदिन व्यवहारातील सामान्य गणित शिकविण्यात येणार आहे. 

बचत गटांद्वारे नोंदणी सुरू 
शहरामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या प्रौढ प्रशिक्षण वर्गासाठी शहरातील प्रत्येक भागातून नोंदणी सुरू आहे. टाटा सामाजिक संस्थेच्या विद्यार्थिनींनी केलेल्या सर्वेक्षणात शहरातील पाच झोपडपट्टी भागात अशिक्षित अर्धशिक्षितांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. आता त्यांना दैनंदिन व्यवहारातील वाचन-लेखन आणि गणित यावे, यासाठी प्रौढ प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण शहरात पात्र प्रौढांच्या नोंदणीसाठी महिला बचत गटाचे सहकार्य घेण्यात येत असून त्यांच्याद्वारे नोंदणीचे काम जोरात सुरू आहे. 

सामाजिक संस्थांचे सहकार्य 
- नागरिकांना किमान लिहिता- वाचता यावे दैनंदिन जीवनात आवश्यक गणित शिकविण्याचा प्रयत्न आहे. यासाठी रोटरी सारख्या सामाजिक संस्थांचे सहकार्य घेण्यात येत आहे. -आयुष प्रसाद, मुख्याधिकारी 
 
बातम्या आणखी आहेत...