आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालकांची लूट करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई; शिक्षणमंत्र्यांचा आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली जर कोणती शाळा पालकांची अार्थिक पिळवणूक करीत असेल तर पालकांनी बिनदिक्कत तक्रार करावी, अशा शाळांना सुरुवातीला समज दिली जाईल, नंतर कारवाई करणे भाग पडेल, अशा स्पष्ट शब्दांत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी इशारा दिला अाहे. त्या संदर्भातील अादेशही त्यांनी जिल्हा शहरातील शिक्षण अधिकाऱ्यांना दिले अाहेत. तक्रार करणाऱ्यांची नावे गुप्त राहतील, असेही तावडे यांनी म्हटले अाहे. 


पालक आपली तक्रार गुप्तपणे करू शकतात. तुम्ही तुमची तक्रार करत असताना त्यावर लिहिलेले नाव हे केवळ प्रशासन कार्यालयातच असणार आहे. कोणत्याही किमतीवर पालकांचे पाल्याचे नाव हे शाळेपर्यंत पोहोचू देण्याचे काम प्रशासन अधिकारी आणि शिक्षणाधिकारी करणार आहेत. त्याकरिता प्रशासन अधिकारी शिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक शाळेला गॅदरिंगच्या नावाखाली लूट करू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे परिपत्रक पाठवण्याची तयारी केली आहे. 


या परिपत्रकानुसार शाळा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाने विद्यार्थ्यांची आणि पाल्यांची लूट करत आहेत त्या सर्व शाळांना कायदेशीर चांगलाच बडगा दाखविला जाणार आहे. पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला स्नेहसंमेलनाच्या नावाने इतकी रक्कम मागितली आहे, असे लेखी तक्रारीत नोंदविले तर त्या शाळेवर थेट कारवाई केली जाणार आहे. या कारवाईकरिता प्रशासन अधिकारी सुधा साळुंखे आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांनी तयारी केली अाहे. 


शासनाचे चांगले पाऊल 
पाल्यांकडून हजार ते बाराशे रुपयांपर्यंतची फी घेतात, त्यात मेकअप ड्रेस आणि दिग्दर्शकाचे शुल्क पालकांना सांगितले जाते. प्रत्यक्षात किती खर्च करतात हे कळत नाही. ऱ्याच बाबी पालकांनाच करायला सांगतात आणि ज्या दर्जाचे कपडे देतात त्याला दोन महिन्यांनंतर पाहिले तर ओळखू येऊ शकत नाहीत. ही गळचेपी बंद करण्यासाठी शासनाने घेतलेला हा पुढाकार अाहे. 
- निशांत कोपरापुरे, पालक ( बदललेले नाव ) 


पालकांनी घाबरू नये, थेट तक्रार करावी 
सोलापूर शहरात जर का अशा काही शाळा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून पैसे घेत असतील तर पालकांनी विद्यार्थ्यांनी थेट प्रशासनाकडे शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी. त्याकडे प्रशासन त्वरित कारवाईच्या दृष्टीने पाहील. तक्रार करणाऱ्या पालकांचे नाव हे शंभर टक्के गुप्त राहील. भविष्य काळात त्या शाळेकडून कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांना होऊ नये म्हणून ही खास तजवीज करण्यात आली आहे. मात्र जोवर पालक पुढे येत नाहीत तोपर्यंत हा व्यवसाय असाच चालू राहील. त्यावर आपल्याला बंधन घालावेच लागेल. विनोदतावडे, शिक्षण सांस्कृतिक मंत्री, राज्य शासन 


संबंधित शाळांवर कारवाई 
ज्या शाळांत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाने विद्यार्थ्यांची पालकांची लूट होते त्या शाळेतील त्या पालकांनी विद्यार्थ्यांनी जर शिक्षणाधिकारी आणि प्रशासनाधिकाऱ्यांकडे थेट तक्रार केली त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येथील. मात्र पालकांनी पुढे यावे, आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. नावासंदर्भात कोणत्याही प्रकारची काळजी करू नये. त्यामुळे शाळांवर कारवाई करणे सोपे होईल.
- सत्यवानसोनवणे, शिक्षणाधिकारी, सोलापूर 


परिपत्रक काढणार 
शिक्षणमंत्री तावडेयांनी सांगितल्याप्रमाणे दोनच दिवसांत परिपत्रक काढून संपूर्ण शहरातील शाळांना स्नेहसंमेलनाच्या नावाने कोणत्याही प्रकारे जबरदस्ती करू नका अशा प्रकारची नियमावली पाठविणार आहे. त्यानंतरही जर काही शाळांनी लूट चालू ठेवली तर पालकांनी थेट तक्रार करावी. त्वरित कारवाई केली जाईल. शिवाय त्यांचे नावही गुप्त ठेवण्यात येईल. 
- सुधा साळुंके, प्रशासनाधिकारी म.न .पा.

बातम्या आणखी आहेत...