आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद: वहन अाकाराचा 21 कोटींचा बोजा; जिल्ह्यातील वीज ग्राहकांमध्ये संताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलामध्ये वाढ झाली आहे. - Divya Marathi
बिलामध्ये वाढ झाली आहे.
उस्मानाबाद - गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणने नवीन वीज वहन आकारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे जिल्ह्यातील वीज ग्राहकांवर महिन्याला अंदाजे २१ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. नवीन वहन आकारामुळेे महावितरला ‘अच्छे दिन’ आले असून ग्राहकांच्या खिशाला मात्र, चाट पडली आहे. व्हॉटसअॅपवर यासंदर्भात महावितरणवर कडवट टीका होत असून ग्राहकांमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 
 
एकाच वेळी अधिक बिल देणे, वेळेवर रिडिंग घेणे, ट्रान्सफार्मरसाठी शेतकऱ्यांची अडवणूक, कर्मचाऱ्यांची लाचखोरी, अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा या कारणांमुळे अगोदरच महावितरण जिल्ह्यात टीकेचे लक्ष्य बनली आहे. आता ‘वहन आकार’ आकारले जात असल्यामुळे आणखी टीकेची झोड उठवली जात आहे. नोव्हेंबरच्या परिपत्रकानुसार जानेवारीच्या बिलापासून वहन आकार आकारण्यात येत आहे. यामुळे बिलात घसघसशीत वाढ होत आहे. जिल्ह्यात दोन लाख नऊ हजार ९४९ घरगुती, व्यावसायिक ११ हजार ९३६, औद्योगिक ३८८६ ग्राहक आहेत. या सर्वांवर गेल्या महिन्याचा अंदाजे २१ कोटी १२ लाख रुपयांचा बोजा पडला आहे. यामुळे व्हॉटस्अॅप फेसबुकवर जोरदार टीका केली जात आहे. सर्वत्र वहन आकारासंदर्भातील मॅसेज व्हायरल होत आहे. काहींनी तर असे बिल भरण्याचे आवाहन केले आहे. महावितरणने यासंदर्भात योग्य निर्णय घेतल्यास शासन महावितरणच्या विरोधात याच मुद्द्यावरून मोठे आंदोलन उभे होऊ शकते. 
 
अन्यायकारक बाब 
- वीज वहन अाकार घेणे ही बाब कायदेशिर रीत्या अन्यायकारक आहे. वीज ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे अतिरिक्त शुल्क घेता येणार नाही. ही जबाबदारी महावितरणची आहे.
-अॅड.प्रवीण अत्रे, विधिज्ञ. 
 
- विजेचे वहन करण्यासाठी हे शुल्क आकारले जात आहे. हा निर्णय शासनस्तरावरुन घेण्यात आला आहे. नियमाप्रमाणे जिल्हास्तरावरून याची वसुली करण्यात येत आहे.
-प्रकाश पौणिकर, अधीक्षक अभियंता. 
 
अगोदरच अन्य शुल्काचा भार 
ग्राहकांना अगोदरच अन्य शुल्कांचा भार आहे. बिलात स्थिर आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क, वीज विक्री कर असे शुल्क आकारण्यात येते. यामुळे युनिट दरापेक्षा बिलाची रक्कम जवळपास दुपटी गाठते. पुन्हा यात वहन आकाराचा भार पडला आहे. 
 
रुपयेप्रती युनिटला आकारणी असाही दुटप्पीपणा? 
कोणतेही वीज आकार, शुल्क ठरवण्यासाठी महावितरणला अगोदर वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव दाखल करावा लागतो. आयोग यासंदर्भात हरकती मागवतो. मात्र, आयोगाकडून यासंदर्भातील नोटीस केव्हा काढली जाते, याचा थांगपत्ता ग्राहकांना कधीच लागू दिला जात नाही. अधिक खपाचे दैनिक वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून सातत्याने यासंदर्भात माहिती प्रकाशित करून ग्राहकांना अवगत करणे अावश्यक आहे. 

सत्ताधारी विरोधातील राजकीय पक्ष मागील दोन महिन्यात निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. या पक्षांच्या नेत्यांना या बाबीकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही. ‘अच्छे दिन’चे स्वप्ण दाखवणारा सत्ताधारी भाजपचे चांगले दिवस असेच आहेत का, असा प्रश्न वीज ग्राहक विचारत आहेत. 

लोकप्रतिनिधींची चुप्पी म्हणे प्रवासाचे शुल्क 
विजेचा ग्राहकांपर्यंतचा प्रवास वीज वाहिनीच्या माध्यमातून होत असतो. या प्रवासाचे शुल्क म्हणजेच वहन आकार असल्याचे अधिकारी कर्मचारी सांगत आहेत. काहींच्या मते हा एक प्रकारचा कर असल्याचेही बोलले जात आहे. 
 
अशी होतेय आकारणी 
प्रत्येक घरगुती, व्यावसायिक औद्याेगिक ग्राहकाला प्रत्येक युनिटला रुपया १८ पैसे अतिरिक्त दर आकारला जात आहे. म्हणजे १०० युनिट वीज आकारली तर अन्य दरांसोबत ११८ रुपये अतिरिक्त दर आकारण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे मीटर असलेल्या शेतीपंपांनाही हाच दर आहे. गुत्ते पद्धतीने वीज वापरणाऱ्या शेतकऱ्यांना एका अश्वशक्तीला १२२ रुपये वहन आकार आकारला जाणार आहे. म्हणजे पाच एचपीचा (अश्वशक्ती) शेतीपंप असेल तर त्याला ६१० रुपये वहन अाकार द्यावा लागेल. 
 
महाविरतणची सारवासारव : सोशल मीडियावरून कडवट टीका सुरू झाल्यामुळे महावितरणने आता सारवासारव सुरू केली आहे. त्यांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार मुळात वहन आकार म्हणजे अन्य कोणतीही अतिरिक्त वाढ नाही. वीज आकाराचाच एक भाग असल्याचे सर्वत्र सांगितले जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...