आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाशाच्या सणात अखंड वीज, झटताहेत महावितरणचे कर्मचारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तिमिरातून तेजाकडे जाण्याचा संदेश देणारा, प्रकाशाचा सण अर्थात दीपावली. दाराबाहेर, देवघरात मंद तेवणाऱ्या पणत्यांचे महत्त्व मोठे आहे. त्याच वेळी आजचे आपल्या साऱ्यांचे जीवनमान गतिमान करणाऱ्या विजेचेही महत्त्व आहे. विद्युत रोषणाई, आकाश दिवे आदींच्या सजावटीत विद्युतपुरवठा अत्यावश्यक बाब आहे. ही वीज नसली तर साऱ्यांचीच तारांबळ उडते. हिरमोड होतो. दिवाळीच्या आनंदात विघ्न येते. दिवाळीचा आनंद निर्विघ्न मिळावा यासाठी महावितरणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते लाइनमनपर्यंत सारेजण दिवसरात्र झटत आहेत; स्वत:चे वैयक्तिक आनंद बाजूला ठेवून. ड्यूटी हीच दिवाळी अशी भावना त्यांच्या मनात तेवत आहे.
शहरात महावितरणची पाच उपविभागीय कार्यालये आहेत. या कार्यालयांमार्फत संपूर्ण शहराला सुरळीत वीजपुरवठा केला जातो. या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये तांत्रिक कामगार काम करत असतात. दरवर्षी दिवाळी येते आणि जाते. मात्र यंदा अधीक्षक अभियंता धनंजय औंढेकर आणि कार्यकारी अभियंता सुरेश कोळी यांनी दिवाळीच्या पाच दिवसांत वीज पुरवठ्यामध्ये एका क्षणाचाही विघ्न पडू नये म्हणून उत्तम नियोजन केले आहे.

शहरातील पाच उपविभागीय कार्यालयांतर्गत २३ शाखा कार्यालये आहेत. प्रत्येक शाखा कार्यालयात किमान सहा जण प्रत्येक शिफ्टमध्ये कार्यरत असतात. सण असो किंवा उत्सव, हे सारे आपापले कर्तव्य बजावतात. २३ शाखा कार्यालयांमध्ये एका शिफ्ट मध्ये एकूण १३८ तांत्रिक कर्मचारी तैनात असतात.

अशी आहे जय्यत तयारी
दिवाळीच्या पाच दिवसांत सर्व अधिकाऱ्यांना रात्रभर आपापल्या परिसरात गस्त घालण्याची जबाबदारी दिली आहे. वीज पुरवठ्यात विघ्न येऊ नये किंवा काही समस्या असल्यास ती कमीत कमी वेळेत सोडवता येईल, याची तयारी केली आहे. इतकेच नव्हे तर याचा आढावा तिन्ही शिफ्टमध्ये वरिष्ठांकडून घेतला जात आहे. आनंद घेऊन येणारी दिवाळी आणि मन प्रफुल्लित करणारे वातावरण अबाधित राहावे यासाठी महावितरणची दिवस- रात्र सेवा सुरू असल्याचे दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...