आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमध्ये अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी केले उपोषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ - शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे मोहोळ ते ढोकबाभुळगाव, सय्यद वरवडे या रस्त्यावर पायी चालत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी खडीच्या रस्त्यावर बांध घातल्याने त्या ठिकाणी पाणी साठत असून सदर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी 100 विद्यार्थ्यांसह पालकांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. 
 
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अभियंता यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत पाच दिवसात सदर रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांनी व पालकांनी आंदोलन मागे घेतले.
    
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मोहोळ ते ढोकबाभुळगाव सय्यद वरवडे रोड क्रमांक 144 हा रस्ता कागदोपत्री 25 मीटर रुंदीचा असून त्या रस्त्यावर चार ते पाच ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. ढोकबाभुळगावसह सय्यद वरवडे, गाढवे वस्ती, मळगे वस्ती, वडवळ, गोटेवाडी, या भागातील नागरिक विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात. विद्यार्थ्यांना दुसरा पर्यायी रस्ता नाही. तसेच या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीची कोणतीही कामे झाली नाहीत. शेतकऱ्यांनी बांध घातल्याने रहदारीचा रस्ता केवळ सहा ते सात फूट रुंदीचा राहिलेला आहे. रस्त्यावर ठीकठिकाणी अतिक्रमण केल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे पडून पावसाचे पाणी साचले आहे. वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांनी दि. 27 रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. दरम्यान, सभापती समता गावडे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत या रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ काढण्याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी ढोकबाभुळगावचे सरपंच शिवाजी पासले, बिलाल शेख, भीमराव मुळे, बंडू मुळे, मारुती मुळे, दत्तात्रय पासले, भागवत मुळे, दादाराव मुळे, भानुदास शिंदे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
     
 - रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणाबाबत संबंधित शेतकऱ्यांना नोटीसा दिल्या आहेत. त्यांनी अतिक्रमण काढले नाही तर दि. 3 जुलै रोजी आमच्या कार्यालयाकडून नियमानुसार अतिक्रमण काढले जाईल. सदर रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. प्रस्तावास मंजुरी मिळताच काम हाती घेऊ. 
सुनीता पाटील, सहा अभियंता
सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मोहोळ
बातम्या आणखी आहेत...