आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ कॅम्पस विकासाचे स्वप्न फसले अतिक्रमणाच्या विळख्यात, 500 एकर भूखंड 12 वर्षांपासून पडीकच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्रातील इतर कोणत्याही विद्यापीठाकडे नसेल इतकी मोठी म्हणजे तब्बल ५०० एकर जागा सोलापूर विद्यापीठाकडे आहे. परंतु, प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या या जागेवर अद्याप एकही शैक्षणिक इमारत उभी राहू शकलेली नाही. दुसरीकडे या ५०० एकर जागेला संरक्षक भिंत नसल्याने अतिक्रमणाचा विळखा पडत चालला आहे. सध्या संपूर्ण ४८२ एकर जागा पडीकच आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून या जागेवर काही प्रमाणात वृक्षलागवड झाली. मात्र सातत्यपूर्ण देखभालीअभावी वृक्षसंपदाही घटत चालली आहे.
 
सोलापूर विद्यापीठाची स्थापना २००४ मध्ये झाली. यानंतरच्या दोन वर्षात म्हणजे डॉ. इरेश स्वामी यांच्या कुलगुरूपदाच्या कार्यकाळात विद्यापीठाला आवश्यक असलेल्या जमिनीचा शोध घेण्यात आला. केगाव येथील सलग ४८२ एकर जागा विद्यापीठासाठी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. द्वितीय कुलगुरू डाॅ. बाबासाहेब बंडगर यांच्या प्रारंभीच्या काळात ही जागा प्रत्यक्ष ताब्यात आली. मात्र, विद्यापीठ छोटे, एका जिल्ह्यापुरते अशी चर्चा झाल्याने मिळालेल्या ४८२ एकर जागेवर करायचे काय ? याचा विचारही करता येत नव्हता. यूजीसीची १२ मान्यताही मिळाली नव्हती. आहे ते अनुदानित कोर्सेस बंद करून स्कूल सिस्टिम विद्यापीठाने स्वीकारली. पुन्हा नव्याने सुरवात झाली.
 
एकीकडे शैक्षणिक प्रगती, दुसरीकडे भौतिक सुविधा साधणे ही दोन्ही आव्हाने समोर असताना विकासासाठी आवश्यक निधी मिळवणे जड जात होते. साहजिकच डॉ. बाबासाहेब बंडगर यांच्या संपूर्ण कालावधीत विद्यापीठाला १२ मान्यता मिळाली नाही. इतर प्रश्न जैसे थे राहिले. यानंतर सध्याचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्याकडे कुलगुरूपदाची धुरा आली. पहिल्या सहा महिन्यात बारा मान्यता मिळवून त्यांनी विद्यापीठ िवकासाला चालना दिली. पुढील एक वर्षात नॅक मूल्यांकन करून विद्यापीठाला शैक्षणिक मानांकन मिळवून दिले. दरम्यान, रूसा योजना कार्यान्वित झाली आणि विद्यापीठाला २० कोटीचा निधी मंजूर झाला.
 
निधी मिळाला, आता फक्त काही परवानगी बाकी आहेत. यात प्रशासकीय इमारत, क्रीडा संकुल यांची उभारणी होणार आहे. मात्र प्रत्यक्षात हातात जी ४८५ एकर जागा आहे, त्यावर संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी नाही. आठ ते दहा लाख रुपये खर्चून विद्यापीठाने काही प्रमाणात संरक्षक भिंत उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सोपवले आहे. पण निधी पुरेसा नसल्याने संपूर्ण मोकळ्या जागेला कंपाउंड बांधणे दुरापास्त दिसत आहे.
 
प्रशासनाचे दुर्लक्षच कारणीभूत
विद्यापीठाच्या ताब्यातअसलेल्या ५०० एकर जागेचा अद्याप विकास नाही. संपूर्ण जागेला किमान तारेचे कंपाउंड तरी हवे. आता अतिक्रमणही होत आहे. विद्यापीठाच्या प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन विद्यापीठ मालमत्तेबाबत सतर्कता दाखवणे गरजेचे आहे.
- डॉ.दिगंबर झोंबाडे, प्राध्यापक
 
५०० एकरजमिनीवरील संकुलाची, प्रशासकीय इमारतीची उभारणी, रस्ता बांधणी याचे संपूर्ण प्रस्ताव मान्य झाले आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. विद्यापीठाकडे पुरेसा निधीही उपलब्ध झाला आहे. मात्र माळढोक आरक्षण उठवण्यात आले असले तरी बांधकाम परवानगीचा मुद्दा अद्याप संदिग्ध आहे. यानंतर विद्यापीठ या ५०० एकरातील आवश्यक शैक्षणिक संकुल उभारणी करेल. अतिक्रमणाचा मुद्यावरही मार्ग काढून संपूर्ण कंपाउंड बांधणी करण्यात येईल.
- डॉ.एन. एन. मालदार, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ
 
सोलापूर विद्यापीठाच्या५०० एकर जमिनीवर अतिक्रमण झाले असले तरी एक पत्राशेड आणि काही जमिनीवर शेती इतकेच त्याचे स्वरूप आहे. जमीन सर्व्हे करून हद्द कायम करून कंपाउंड उभारणी करण्यात येईल.
- पी.प्रभाकर, प्रभारी कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ
 
वाढीव भरपाईची मागणीही पुढे
विद्यापीठाची जमिनी संपादित करताना मुआवजा मूळ जमीन मालकांना देण्यात आला, त्यानंतरच जमिनी संपादित करण्यात आली. मात्र आता त्याच जमीन मालकांनी मिळालेला मुआवजा मान्य नसल्याचे कारण पुढे करत वाढीव पैशाची मागणी न्यायालयातील याचिकेद्वारे केली आहे. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ आहे.
 
दिवसेंदिवस वाढतच आहे अतिक्रमण
कोंडी लमाण तांडाशेजारील विद्यापीठाच्या जमिनीवर चक्क पत्रा शेड मारून दुग्ध व्यवसाय, इतर व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. तब्बल १० ते १२ एकर जागा आता अतिक्रमणित झाली आहे. नजीकच काहींनी शेत नांगरून पीक घेण्यास प्रारंभ केला आहे. म्हशी बांधून, चारा ठेवून हे अतिक्रमण हळूहळू आपले रूप विस्तारत आहे. सध्या सात ते आठ पत्रा शेड, गोठा , त्याअनुषगांने तेथे वास्तव्य असे अतिक्रमण सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...