आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झेरॉक्स नोट्सवरच चाललाय अभ्यास, टेक्स्टबुक्स सेट घेणे आवाक्याबाहेरचे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाने इंजिनिअरिंगसाठी ७० : ३० टक्के हा फॉर्म्युला लागू केला खरा. पण या अद्ययावत अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली टेक्स्टबुकही बाजारात उपलब्ध आहेत काय, असली तरी विद्यार्थी ती विकत घेऊन अभ्यास करतील का? याचा शोध घेण्याची गरज बीओएस समितीलाही कधी वाटत नाही. केवळ टेक्स्ट बुक, रेफरन्स बुकची यादी जाहीर केली जाते, मग सुरू होते विद्यार्थ्यांची नोट्स् मिळविण्याची धावपळ.

उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठाची पायरी चढली की विद्यार्थ्यांनाही क्लासमध्ये बसण्याची, अभ्यास करण्याची, नोट काढण्याची गरजच वाटत नसल्याचे धक्कायदायक चित्र दिसते. पदव्युत्तर क्लासमध्ये हे चित्र सर्रास दिसते. २० ते ४० विद्यार्थ्यांच्या क्लासमध्ये केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच मुले क्लासेसमध्ये आढळतात.

पदवी पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांना प्राध्यापकांचा तास अटेंड करण्याची गरज वाटत नाही, दुसरीकडे अभ्यासाचे पूरक साहित्यही सहजासहजी उपलब्ध नसते. लायब्ररीत गेले तरी कोणते पुस्तक घ्यावे, नोट्स कशा काढाव्यात यासाठीचा संयमीपणाही अंगी नाही. झटपट अभ्यास करण्यासाठीचे गाईडसही पदवी पदव्युत्तर वर्गासाठी उपलब्ध नसतात. साहजिकच एेन परीक्षेच्या काळात रेडिमेड नोट्स मिळविण्यासाठीची धावाधाव सुरू असल्याचे दिसून येते.

टेक्स्टबुकही मिळतात, पण ...
अभ्यासक्रमालापूरक अशी टेक्स्टबुकही पुस्तकांच्या दुकानातून उपलब्ध होत नाहीत. जी उपलब्ध असतात ती प्रचंड महागडी असतात. त्यातही प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विषयाचे संपूर्ण पुस्तक विकत घेऊ शकत नाही. झेरॉक्स सेंटरवर कदाचित नोटसचे सेटस मिळू शकतात.

पुस्तकांची दुनिया महाग
उच्च शिक्षण घेताना पुस्तके विकत घेऊन त्याचा अभ्यास करणे खूपच महागडे ठरते. विधी, अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसी ची पुस्तके खूपच महागडी असल्याने झेरॉक्स नोटस वापरणे सुरू आहे.

ग्रंथालयाचा वापर, हाच आता राजमार्ग ठरेल
पुस्तकांच्या दुकानांत मागेल ती पुस्तके उपलब्ध असतात, असे नाही. याचे कारण सर्व पुस्तकांचा सर्व सेट मागवून ठेवणे, विक्रीपर्यंत सांभाळणे कठीण आहे. ऑनलाइन खरेदीचा पर्याय उपलब्ध असला तरी खर्चिक मार्ग आहे. महाविद्यालयीन लायब्ररीचा वापर हाच राजमार्ग आहे. थर्मोडायनॅमिक्स हे इंजिनिअरिंग वरील एक पुस्तक, ऑनलाइन खरेदीसाठी हजार ५५५ रुपये पडतात. विषयानुसारची पुस्तके ३०० रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असतात.

टेक्स्टबुक उपलब्ध नसल्याने
टेक्स्टबुक उपलब्ध नसल्याने सध्या विविध झेरॉक्स सेंटरवर सिलॅबस वाईज नोटस उपलब्ध असतात. एका विषयाचे १५ ते २० रेफरन्स बुक वाचून नोट्स काढण्याच्या किचकट प्रक्रियेऐवजी तयार झेरॉक्स सेंटरमधून १०० ते २०० रुपयांना मिळणारी नोट्स घेणे त्यावर परीक्षेची तयारी करणे ही अभ्यासाची पद्धत बनली आहे. झेरॉक्स सेंटरमध्ये अशा नोटेच्या थप्पी मिळतात. एखाद्या विद्यार्थ्याने पेन ड्राईव्हमध्ये पीडीएफ फाईल दिली की पहिल्या नोट्सची झेरॉक्स कॉपी तयार हाेते. ही कॉपी सेव्ह करून ठेवली जाते मागणीनुसार पुरवठा सुरू होतो.

‘नाेट्स’ची आदर्श पद्धत
पदव्युत्तर म्हणजे एमए, एमकॉम, एमएस्सी, एमई अशा अभ्यासक्रमांसाठी टेक्स्टबुक ऐवजी सिलॅबस रेफरन्स बुक्सची लिस्ट लागू केली जाते. सिलॅबसच्या अनुषंगाने ही रेफरन्स बुक्स वाचून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, तासिकांमधून महत्त्वाचे आवश्यक मुद्द्यांचे मनन करावे. अभ्यासानंतर हे मुद्दे मोठ्या कागदांवर व्यवस्थित लिहावेत. थोडक्यात नोट्स काढाव्यात. सुट्टे कागद ठेवता विषय वाईज फाईल तयार करावी. एकदा लिहून काढले की परीक्षेच्या काळात निव्वळ मुद्द्यावरून नजर फिरविली तरी संपूर्ण रिव्हिजन होते. अभ्यास करण्याची ही आदर्श पद्धती.

^टेक्स्टबुक बाजारपेठेतउपलब्ध आहेत, सोलापुरातही मिळतात. ऑनलाइन मिळतात. मात्र विद्यार्थी सर्व पुस्तके खरेदीपेक्षा चार पाच जणांचा ग्रुप करून त्याचा एकत्रित वापर करतात. महाविद्यालयातही टेक्स्टबुकही उपलब्ध असतात. पुस्तकांच्या झेरॉक्स काढून त्याच्या प्रती बनविणे वापर करणे यातून कॉपीराईटचा भंग सारखा प्रकार होत असल्याने तसे करणे टाळावे. हा मुद्दा लक्षात ठेवला जावा, असे मी म्हणेन.'' डॉ.शशिकांत हलकुडे, प्राचार्य, वालचंद अभियांत्रिकी, सोलापूर

कॉपीराईटचा भंग होत असल्याने दक्षता
^मी सिंहगडअभियांत्रिकीत मेकॅनिकल शाखेत शिकतो आहे. घरी अभ्यासासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना कॉलेजकडून दोन दोन पुस्तके प्रत्येक आठवड्याला मिळतात. यात वाढ झाली तर विद्यार्थ्यांची आणखी सोय होईल. कारण पुस्तकांची उपलब्धता विद्यार्थ्यांना या माध्यमातूनच होत असते. अन्यथा झेरॉक्स काढणे, तयार नोटस वापरणे हा मार्ग आहे. पण टेक्सबुक वाचून त्यावरील नोटस काढणे हाच उत्तम मार्ग. '' गणेशथोरात, विद्यार्थी, सिंहगड अभियांत्रिकी, सोलापूर

पुस्तके वापरण्यास मिळतात, वाढ हवी
^मी एमएइकॉनॉमिक्स करतोय. अभ्यासासाठी जेवढी पूरक टेक्स्टबुक आहेत, त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मात्र ही पुस्तके स्वतंत्रपणे विकत घेणे शक्य नाही. नोटसच्या झेरॉक्स काढून अभ्यास करतो आहे. परीक्षेच्या काळात अशा नोटस अनेक विद्यार्थ्यांच्या हातात दिसतील. हीच प्रचलित पद्धत झाली आहे.'' रमेशकावडे, विद्यार्थी , सोलापूर विद्यापीठ
झेरॉक्स नोटस वापरणे प्रचलित पद्धत
बातम्या आणखी आहेत...