आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वपक्षीय पराभूत एकवटले, ‘ईव्हीएम’वर खापर फोडले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -  महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्वपक्षीय उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरच (ईव्हीएम) राग व्यक्त केला. पराभवाचे खापर त्यावरच फोडले. त्याची चौकशी करावी, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त विजयकुमार काळम यांच्याकडे केली आहे. 
 
गेल्या आठवड्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत भल्याभल्यांची धूळधाण उडाली. अनपेक्षित निकाल ऐकून बड्यांना धक्काही बसला. भाजपच्या सरशीमुळे राज्यभर अशीच स्थिती आहे. त्याच्या विश्लेषणात मतदान यंत्रालाच आरोपी ठरवले. सोलापुरातही अशीच स्थिती निर्माण झाली. मतदान यंत्रांची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन घेऊन सोमवारी एक शिष्टमंडळ महापालिकेत आले. 

शिवसेनेचे पराभूत उमेदवार विष्णू कारमपुरी यांनी त्याचे नेतृत्व केले होते. त्यात माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, दत्तोबा बंदपट्टे, नलिनी चंदेले, नारायण माशाळकर, सुनीता चिलका, केदार उंबरजे, सारिका सुरवसे, अविनाश बनसोडे, अश्विनी जाधव, सिद्धेश्वर मुनाळे, अंबिका मामड्याल, मंजुश्री वल्लाकाटी, कैरूनबी शेख, प्रशांत कांबळे, मीनाक्षी निशाणदार, सोनाली लाड, रोहिणी सावंत, विनोद गायकवाड, सरस्वती पाटनूरकर आदी होते. 
 
मनपा पराभूत उमेदवारांची आज बैठक 
महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांची तातडीची बैठक मंगळवारी दुपारी ३.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे होणार आहे. अशी माहिती पराभूत उमेदवार बसवराज बगले यांनी दिली. निवडणुकीत मशिनच्या तांत्रिक चुकामुळे अनेकांना पराभव स्वीकारावा लागला. यावर चर्चा करून न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार अाहे. याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व पराभूत उमेदवारांनी बैठकीस उपस्थित राहवे, असे आवाहन पराभूत उमेदवार बगले. प्रा. भोजराव पवार, सुरेश स्वामी यांनी केले आहे. 
 
तक्रारीतील मुद्दे 
१.मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बदल झाल्याने आकडेवारी बिघडली. एकाच पक्षाकडे अधिक मते गेली. 
२. मतांची ढोबळ आकडेवारी आणि प्रत्यक्षात मिळालेली मते यात प्रचंड तफावत असल्याने संशय. 
३. मतदान केंद्रांतील मॉकपोल आणि त्याचे सीसीटीव्ही फुटेज यांचीही तपशीलवार चौकशी करावी. 
४. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची चौकशी समिती नियुक्त करून या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी. 
५. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन झालेले दिसून येत नाही, नियमांचे उल्लंघनही झाले आहे. 
६. ज्या भागात उमेदवाराचे प्राबल्य, तिथेही संबंधितास संशयास्पद मते मिळाली, पडताळणी करावी. 

अन्यथा न्यायालयात 
^भारतीय राज्यघटनेने लोकशाहीला पूरक अशा वातावरणात निवडणुका घेतल्या पाहिजेत, असे म्हटले आहे. पण लोकशाहीचा गळा घोटणारी प्रक्रिया झाल्याचा संशय आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू.” विष्णूकारमपुरी, पराभूत उमेदवार, शिवसेना 
 
बातम्या आणखी आहेत...