आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर जिल्ह्यातील एक लाख ३० हजार शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे वारे जोरात वाहू लागले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात याची घोषणा होण्याकडे शेतकऱ्यांचे कान लागले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात थेट निर्देश नसले तरी वििवध विभागात माहिती संकलनाची लगबग वाढली आहे. कर्जमाफी झाली तर जिल्ह्यातील एक लाख तीन हजार ७९५ शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 
 
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येने मर्यादा ओलांडली आहे. जिल्ह्यातही गेल्या दोन महिन्यांमध्ये ३३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकऱ्यांच्या उत्त्थानासाठी शासनाने सुरू केलेल्या योजना नेमक्या कोठे जिरत आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. या योजना ज्यांना गरज आहे, अशांना मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास अद्यापही तयार नाही. यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय पर्याय नाही, असा मतप्रवाह राज्यात तयार झाला आहे. परिणामी विरोधकांकडून केली जाणारी कर्जमाफीची मागणी विधानभवनात सत्ताधारी भाजपच्या आमदारांनीही ताणून धरली आहे. आता सत्ताधारी भाजपचे आमदार मैदानात उतरल्यामुळे राज्यात कर्जमाफी होणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. 

शासनाकडून शासकीय अधिकाऱ्यांना अद्याप कर्जमाफीच्या अनुषंगाने माहिती मागवण्यात आलेली नाही. तसेच अधिकाऱ्यांना कोणते आदेश देण्यात आलेले नाहीत. गतवेळी कर्जमाफी केली जात असताना अचानकच माहिती मागवण्यात आली होती. त्यावेळी शासकीय अधिकारी, कर्मचारी, बँकांना मोठी धावपळ करून तसेच रात्रभर जागरण करून माहिती संकलित करावी लागली होती. मागील अनुभव लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्वच प्रमुख कार्यालयात माहितीची जुळवाजुळव करण्यात आली आहे. काही ठिकाणी पूर्ण आकडे नाहीत, त्या ठिकाणी संकलनासाठी धावपळ करण्यात येत आहे. 

कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर प्रथमदर्शनी जिल्ह्यातील एक लाख हजार ७९५ शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. या शेतकऱ्यांनी एकूण ७६८ कोटी ५५ लाख ३३ हजार रुपये कर्ज पिककर्ज घेतले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून विविध सहकारी संस्थेच्या ९१ हजार ९०२ शेतकरी सभासदांनी ५८५ कोटी ३७ लाख ५३ हजार कर्ज घेतले आहे. पीक कर्ज देण्यामध्ये प्रथमपासूनच कंजूषी करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांनी ११ हजार ८१३ शेतकऱ्यांना १९६ कोटी ७५ लाख वितरण केले आहे. सहकारी बँकेतील १३ कोटी ५७ लाख दोन हजार कर्जाची वसुली झाली आहे. शासनाच्या निर्णयानुसार प्रथमदर्शनी या सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकारी, राष्ट्रीयकृत, ग्रामीण बँका सतर्क झाल्या. उर्वरित माहिती संकलनासाठी कर्मचाऱ्यांची लगबग सुरू आहे. 

पतसंस्था सभासद काळजीत 
सहकारी पतसंस्था, मल्टीस्टेट सोसायट्यांतील कर्जदारांना कर्जमाफीचा मिळाला नव्हता. हे सभासद काळजीत आहेत. वास्तविक पहाता तातडीने कर्जासाठी अनेक शेतकरी या संस्थांकडे गेले होते. मात्र, अशा संस्थांमध्ये पदाधिकारीच फुगवून कर्ज घेत असल्याचे निदर्शनात आल्याने गतवेळी त्यांना लाभ मिळाला नाही. 

पॅकेज गायबच 
उस्मानाबाद, यवतमाळ जिल्ह्यासाठी ११०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर झाले होते. यासाठी खर्चाचा डीपीआर तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होेते. प्रशासनाकडून सुधारित प्रस्ताव दाखल करण्यात आलेला असतानाही जिल्ह्याच्या हक्काचे ५५० कोटी मिळाले नाहीत. किमान आता कर्जमाफी तरी प्रत्यक्षात उतरावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली आहे. 
सहकारी संस्था राष्ट्रीयकृत बँकेतील कर्जदार 

१.३ - लाखकर्जदार 
७६८.५५ - कोटीकर्ज वितरण 
९१,९०२ - सहकारीसंस्थेचे कर्जदार 
५८५.३७ - कोटीसहकारी संस्थेतील कर्ज 

आदेश नाहीत 
^कर्जमाफीच्या अनुषंगाने अद्याप शासनाकडून माहिती मागवण्याच्या दृष्टीने आदेश आलेले नाहीत. मात्र, सर्व प्रकारची माहिती अद्यायावत आहे. अशी माहिती मागवल्यास देण्यात येईल. -के.बी. वाबळे, जिल्हा उपनिबंधक. 
बातम्या आणखी आहेत...