आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांनो, कणखर बना, भ्याडपणा सोडा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वालवड- आत्महत्या केल्याने शेतकऱ्यांच्या कुटंुबासमोरील दु:ख संपण्याऐवजी वाढतच जातात. त्यामुळे कुटुंबाची फरपट होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत, कणखर बनावे, असे आवाहन करून आत्महत्या हे भ्याडपणाचे लक्षण असून, पुरुषार्थाचे लक्षण नाही, असे मत मराठी सिनेकलाकार ऐश्वर्या बडदे यांनी व्यक्त केले. भूम तालुक्यातील वालवड येथे मकरसंक्रांतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

विचारमंच परिवाराच्या वतीने महिलांसाठी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सिनेकलाकार ऐश्वर्या बडदे, डॉ. प्रियंका आहेर, अॅड. अमृता गाढवे आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गावातील विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. योगिता खटाळ, अॅड. सारिका चौधरी यांना कन्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, यावेळी बोलताना ऐश्वर्या बडदे म्हणाल्या, घरातील कर्त्यापुरुषाने आत्महत्या केल्यास परिवार देशोधडीला लागतो. पाठीवरच्या नातलगांची होरपळ होते. पत्नी, आई - वडिलांचा आधार निखळतो. त्यांचे व्यवस्थित संगोपण होत नाही, अशी खंत व्यक्त केली.
कार्यक्रमाला डॉ. एच. डी. अंधारे, सरपंच सीता पाटोळे, ग्रामपंचायत सदस्या पार्वती मोहिते, शारदा देवळकर, सुनीता अंकुश, सविता कांबळे, ग्रामपंचायत सदस्या बेबी पठाण, भूम तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालिका सीता शेळके, लताताई विभुते आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी माळी यांनी तर आभार सीमा विभुते यांनी मानले. यावेळी महिलांची मोठी उपस्थिती होती.

अकरा महिलांना पैठणी
कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळात विजयी झालेल्या ११ महिलांना पैठणीचे बक्षीस भेट म्हणून देण्यात आले. यामध्ये जयश्री हुंबे, स्वाती नाईक, अनिता हिंवरे, शुभांगी देशमुख, संगीता आरगडे, जनाबाई भोरे, राहिबाई नाईक, पद्मीन देवळकर, ऊर्मिला कदम, आश्विनी मेंगडे आदींचा समावेश होता. तसेच उपस्थित महिलांना स्वच्छतेसाठी कचरा टोपलीचे वाण म्हणून वाटप करण्यात आले.

पत्रकाद्वारे प्रबोधन
यावेळी स्त्रीभ्रूण हत्या टाळा, लेक वाचवा, देश वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा आदी संदेश देणाऱ्या पत्रकांचे वाटप करण्यात आले.

माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
निर्भया हेल्पलाइनच्या प्रमुख अॅड. अमृता गाढवे यांनी तयार केलेल्या छेडछाडींना बळी पडणाऱ्या मुलींकरिता कायदेशीर माहिती पुस्तिकेचे डॉ. प्रियंका आहेर अभिनेत्री ऐश्वर्या बडदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.