आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील रेल्वेस्थानकातील खाद्य स्टॉलवर महिला राज, 33 % आरक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
३३ टक्के स्टॉल महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. - Divya Marathi
३३ टक्के स्टॉल महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
सोलापूर- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या केटरिंग धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले असून याअंतर्गत महिलांना रोजगार मिळावा आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी रेल्वेने पहिल्यांदाच केटरिंग धोरणात महिलांना ३३ टक्के वाटा दिला. महिला दिनानिमित्त रेल्वेने दिलेल्या भेटीने  आनंद व्यक्त केला जात आहे. 

लवकरच देशभरातील सर्व  रेल्वेस्थानकावर खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी स्टॉलच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. यात ३३ टक्के स्टॉल महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.  रेल्वेच्या या धोरणात सर्वच दर्जाच्या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. स्टॉलबरोबरच ट्रॉली देखील महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे.  सध्या एवन, ए , बी आणि सी दर्जाच्या स्थानकांवरील २५ टक्के स्टॉल  समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी राखीव आहेत. यात एससी, एसटी, बीपीएल, ओबीसी, अल्पसंख्याक, दिव्यांग व स्वातंत्र्यसैनिक आदी घटकांचा समावेश आहे, तर डी, ई व एफ दर्जाच्या स्थानकांवरील स्टॉलसाठी ४९.५ टक्के राखीव आहेत. यात एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्याक घटकांचा समावेश करण्यात आला. यात आता ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.   

स्टॉलवर औषधी व अन्य वस्तूही उपलब्ध होणार   
आतापर्यंत रेल्वेस्थानकावरील स्टॉलवरून केवळ खाद्यपदार्थ मिळत होते. नव्या धोरणानुसार आता स्टॉलवर खाद्यपदार्थांसोबतच औषधे, प्रवासासाठी लागणारे साहित्य देखील मिळणार आहे. तसेच स्थानिक खाद्यपदार्थ देखील  विक्रीस असणार आहेत. याची सुरुवात कोकण रेल्वेपासून सुरू झाली आहे. कोकणी पदार्थ कोकणातील सर्व स्थानकांवर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे महिलांना रोजगारासाठी वेगळी संधी निर्माण झाली आहे.   
 
अंमलबजावणी लवकरच  
- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केटरिंग धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यानुसार येणाऱ्या काळात केटरिंगमध्ये ३३ टक्के वाटा महिलांना देण्यात येणार आहे. याच्या अंमलबजावणीला देखील लवकरच सुरुवात होणार आहे. महिलांच्या सक्षमतेसाठी हा अत्यंत चांगला निर्णय आहे.  
अनिलकुमार सक्सेना, मुख्य जनसंपर्क अधिकारी, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली.
बातम्या आणखी आहेत...